नरेंद्र मोदींची पंतप्रधापदी नेमणूक, शपथविधी २६ मे रोजी

modi-wins-650_122012081331
नवी दिल्ली – भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या शपथविधीची तारीख निश्चित झाली असून, येत्या २६ मे रोजी सोमवारी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात संध्याकाळी सहा वाजता होणार शपथविधी होणार आहे. यावेळी नरेंद्र मोदींबरोबर ‘रालोअ’चे ३३५  सदस्य खासदारकीची शपथ घेतील.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर केली.
प्रथम रालोअच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना भेटून नरेंद्र मोदींची रालोअच्या नेतेपदी निवड केल्याची माहिती दिली. रालोअचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटून आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोदींची पंतप्रधानपदी नेमणूक केली. त्याआधी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मंगळवारी झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर याच हॉलमध्ये झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीतही नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी संसदीय नेतेपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मुरली मनोहर जोशी, नितीन गडकरी, सुष्मा स्वराज, अरुण जेटली या सर्व प्रमुख नेत्यांनी अनुमोदन दिले.  त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड झाल्याची घोषणा केली. या बैठकीनंतर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे आणि तेलगु देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू उपस्थित होते. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीला भाजपचे सर्व नवनिर्वाचित खासदार, नेते आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.  लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक २८२ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.  मोदी प्रथमच संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


9 × six =