नागपूर ग्रामीणमध्ये उमेदवारांचा रणकल्लोळ

नागपूर – प्रचारासाठी फारच कमी दिवस उपलब्ध असल्याने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने प्रारंभीच वेग घेतला आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तिथी संपल्याने आता लढवय्यांसाठी मैदान मोकळे झाले आहे.यावेळी युती, आघाडी तुटल्याने संपूर्ण राज्यात पंचरंगी लढतीचे चित्र आहे. त्यामुळे कोण किती पाण्यात आहे, याची प्रचिती निवडणूक निकालातून दिसणार आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशामुळे राज्यातील भाजपा नेत्यांच्या स्वप्नांना बळ मिळाल्याने त्यांना मुख्यमंत्रिपद दिसू लागले आहे. शिवसेनेलाही राज्यात आता आपली ताकद सिद्ध करावी लागणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या  मृत्युनंतर  पहिल्यांदाच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भरघोस यश प्राप्त करण्याचे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधून राज्यावर भगवा फडकविण्याचे स्वप्न शिवसेना पाहू शकते. पण  निवडणूक निकालानंतरच ते स्पष्ट होणार आहे. युती, आघाडी तुटल्याने अनेकांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. पंचरंगी लढतीत कोणाच्या पारड्यात बहुमत येते हे पाहणे रोमांचक ठरणार आहे.
यावेळी काँग्रेस व राष्टÑवादीला अँटी इंकम्बसीचा फटका बसणार आहे. मागील १५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेस-राकाँ आघाडीच्या कामकाजावर जनता प्रचंड नाराज आहे. विशेषत: विदर्भातील जनता संतप्त आहे. विदर्भाचा विकास न करता त्यात अनेक अडथळे निर्माण करण्यात आल्याचा वैदर्भीयांचा आरोप आहे. त्यामुळे काँग्रेसचा गड असलेला विदर्भ यावेळेस भाजपाला साथ देण्याची शक्यता आहे.  नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, रामटेक, उमरेड, हिंगणा व कामठी विधानसभा मतदार संघात यावेळेस पंचरंगी लढती होत असल्याने याचा फटका कोणाला बसेल व कोणाचे भाग्य फळफळणार हे अतिशय  अनिश्चित बनले आहे. प्रत्येकालाच आपण विजयी होण्याचे स्वप्न दिसत असल्याने प्रचार कार्याने वेग घेतला आहे. काही उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीपासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. सभा, संमेलने तसेच भूमिपूजनांचे कार्यक्रम घेऊन जनतेला आपल्या कामांची ओळख करून देण्यात येत होती.
सावनेर : केदारांना मोकळे रान?
सावनेर मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे काँग्रेसची उमेदवारी सुनील केदार यांना मिळाली आहे. येथून  उमेदवारी प्राप्त करण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गावंडे यांनी फिल्डिंग लावली होती. परंतु आघाडी तुटल्याने त्यांच्याही इच्छेवर पाणी फेरले गेले. त्यातच भाजपाचे उमेदवार सोनबा मुसळे यांची उमेदवारी रद्द झाल्याने केदार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. येथून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा असलेल्या आशिष देशमुख व भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. पोतदार यांना पक्षाने संधी दिली नाही.  डॉ. पोतदार यांना तिकीट मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. ही अपेक्षा खरी ठरली असती तर काँग्रेसच्या उमेदवाराला ही निवडणूक निश्चितच कठीण गेली असती. पण तसे घडले नाही.त्यामुळे ही निवडणूक यावेळेसही एकतर्फी होण्याची शक्यता आहे. सुनील केदारांच्या विरोधात उभे असलेले राकाँचे किशोर चौधरी, बसपाचे सुरेश डोंगरे, मनसेचे प्रमोद ढोले व शिवसेनेचे विनोद जीवतोडे हे फारसे तग धरू शकणार नाहीत.
काटोलमध्ये अनिलबाबूंची दमछाक
काटोल विधानसभा मतदार संघात यावेळी राकाँचे उमेदवार अनिल देशमुख यांना तिरंगी लढतीला सामोरे जावे लागणार आहे. यावेळेस भाजपातर्फे आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आशिष देशमुखांनी सावनेर मतदारसंघातून लढण्याची पूर्ण तयारी केली होती. परंतु महायुती तुटल्याने त्यांना काटोल मतदारसंघातून लढण्याची संधी देण्यात आली. येथे ते आपल्या काकांच्याविरोधात कितपत टिकाव धरू शकतील, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. राकाँचे अनिल देशमुख यांना येथून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नरखेड पंचायत समितीचे सभापती राजू हरणे यांच्यासोबत खरी लढत द्यावी लागणार आहे.
महायुती तुटल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता असली तरी शिवसेनेचे राजू हरणे या तळागाळातील व्यक्तीला शिवसेनेने उमेदवारी दिल्याने यावेळेस शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह असून यावेळी काटोल मतदारसंघावर भगवा फडकविण्याच्या इर्षेने ते झपाटले आहेत. शिवसेनेने आतापर्यंत येथून आयात केलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने ते अनिल देशमुख यांच्यासमोर टिकाव धरू शकले नव्हते. शिवसेनेची बाहेरची उमेदवारी अनिल देशमुखांच्या पथ्यावर पडत होती. यासोबतच काँग्रेसने उमेदवारी दिलेले दिनेश ठाकरे हे येथून नशिब आजमावत आहे. मनसेचे दिलीप गायकवाड व बसपाचे सुधीर मेटांगळे आणि शेकापचे राहुल वीरेंद्र देशमुख हे  नशिब आजमावत आहेत. परंतु खरी लढत  शिवसेनेचे राजेंद्र हरणे व राकाँचे अनिल देशमुख यांच्यातच खरी लढत होणार आहे.
हिंगण्यात भाजपासमोर
राकाँचे आव्हान
हिंगणा मतदार संघातून राकाँचे उमेदवार व माजी मंत्री रमेशचंद्र बंग रिंगणात आहेत. त्यांनी आधीपासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मागच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी मतदारसंघाची मोर्चेबांधणी नव्याने केली होती. कार्यकर्त्यांना जोडून स्थानिक पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायत स्तरावर पक्षाचे नेटवर्क मजबूत केले आहे. त्यांना यावेळी आपल्या विजयाची खात्री आहे.
भाजपाचे आमदार विजय घोडमारे यांचे तिकीट कापून यावेळी समीर मेघे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु यामुळे विजय घोडमारे यांनी कोणतीही नाराजी व्यक्त न करता पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारकार्यास वाहून घेतले आहे. त्यामुळे राकाँचे उमेदवार रमेशचंद्र बंग यांना भाजपाचे समीर मेघे तगडे आव्हान देतील, असे चित्र आहे. यासोबतच येथून मनसेचे किशोर सरायकर हे नशीब आजमावत आहेत तर शिवसेनेकडून माजी खासदार प्रकाश जाधव व काँग्रेसच्या कुंदा राऊत मैदानात आहेत. मात्र  खरी लढत ही राकाँ व भाजपा उमेदवारांमध्येच होणार आहे.
रामटेकमध्ये तिरंगी लढत
रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल मागील चार टर्मपासून विजयी होत असले तरी यावेळेस त्यांना  कठीण संघर्ष करावा लागणार आहे. काँग्रेसची तिकीट मिळण्याच्या अपेक्षेत गावोगावी प्रचार करणाºया अमोल देशमुखांना काँग्रेसने ठेंगा दाखविल्यानंतर ते आता राकाँकडून निवडणूक लढवित आहेत. काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपाने डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांना उमेदवारी देऊन शिवसेनेच्या उमेदवाराला आव्हान दिले आहे. मागील वर्षी गोंगपा या पक्षाकडून लढून रेड्डी यांनी चांगली मते घेतली होती. त्यांचे रामटेक मतदार संघात समाजकार्य असल्याने तसेच भाजपाच्या पाठबळाने ते यावेळी आशिष जयस्वाल यांना चांगलीच टक्कर देण्याच्या स्थितीत आहेत. भाजपा-शिवसेना युती असल्याने आशिष जयस्वाल यांना चार वेळा सहज विजय मिळवता आला. परंतु यावेळेस  त्यांना मिळालाच तर निसटता विजय मिळण्याची शक्यता आहे. मनसेचे योगेश वाडिभस्मे व इतर अपक्ष मैदानात असले तरी शिवसेनेचे आशिष जयस्वाल, भाजपाचे डी. मल्लिकार्जुन रेड्डी व राकाँचे  अमोल देशमुख यांच्यातच तिरंगी लढत होणार आहे.
उमरेडमध्ये एकतर्फी निवडणूक
उमरेड विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने येथील समीकरणे पार बदलली आहेत. परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून भाजपाने आपले स्थान बळकट करीत सुधीर पारवे यांना गेल्या वेळी विजयी केले होते. यावेळीही भाजपाने विद्यमान आमदार सुधीर पारवे यांनाच संधी दिली आहे. तर काँग्रेसने संजय मेश्राम यांना उमेदवारी दिली आहे. यासोबतच अपक्ष म्हणून राजू पारवे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. राष्टÑवादी काँग्रेसने रमेश फुले यांना उमेदवारी दिली आहे. परंतु येथून भाजपा उमेदवाराविरोधात इतर पक्षांना तगडा उमेदवार देता न आल्याने येथील निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कामठीत सरळ लढत
कामठी मतदारसंघात यावेळी भाजपाने विद्यमान आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली आहे. बावनकुळे यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे आणि यावेळी चौथ्यांदा निवडणूक जिंकतील अशी त्यांचा कार्यकर्त्यांना आशा आहे. यावेळी काँग्रेसने त्यांच्याविरोधात राजेंद्र मुळक यांना उमेदवारी दिली आहे. मुळक यांनी नागपुरातील पश्चिम मतदार संघातून उमेदवारी मिळविण्याचा  प्रयत्न केला होता. परंतु त्यांना पक्षाने कामठी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे आदेश दिले. काँग्रेसकडून आधी इच्छुक असलेले सुरेश भोयर यांनी बंड करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु राजेंद्र मुळक यांना त्यांची समजूत काढण्यात यश आले आहे व ते आता मुळक यांच्यासोबत प्रचार करीत आहेत. यामुळे यावेळी कामठी मतदारसंघात भाजपा व काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत होणार आहे. यात शिवसेनेचे तापेश्वर वैद्य, राकाँचे डॉ. महेंद्र लोधी यांना मिळालेल्या मतांवर विजयाचे गणीत ठरणार आहे. काँग्रेसला बरिएमंच्या सुलेखा कुंभारे यांच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे.नुकताच त्यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे  भाजपाचे पारडे अधिक जड झाले आहे. राजेंद्र मुळक नसते तर बावनकुळे यांना सहज विजय मिळाला असता. मुळकांमुळे त्यांना थोडी जास्त मेहनत करावी लागेल एवढेच. काँग्रेसचे उमेदवार त्यांच्यासमोर कितपत आव्हान निर्माण करतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
’ सुरेश चरडे
९५९५५२९०८०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 + = fourteen