
कोहिमा – नागालॅंडच्या मॉन जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी घात लावून केलेल्या हल्ल्यामध्ये आसाम रायफल्सचे आठ जवान शहीद झाले असून, सह जवान जखमी झाले आहेत. निमलष्करी दलाचे चार जवान बेपत्ता असल्याची माहिती आहे.
रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास आसाम रायफल्सचे १८ जवांन चांगलांगसू गावात पाणी आणण्यासाठी ट्रकमधून चालले असताना आधीपासूनच दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.
जवानांच्या ट्रकवर त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला. आसाम रायफल्सच्या जवानांनीही या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात दहशतवादीही ठार झाले आहेत मात्र त्यांचा आकडा समजू शकलेला नाही. या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे.
एनएससीएन (के) या दहशतवादी गटाने हा हल्ला केल्याचा संशय आहे. एनएससीएन(के) ने मागच्या महिन्यात केंद्राबरोबर पंधरावर्षापासून असलेला शस्त्रसंधी करार मोडून सुरक्षापथकांना लक्ष्य केले.
दोन एप्रिलला या संघटनेच्या दहशतवाद्यांनी अरुणाचलप्रदेशच्या तिराप जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर सापळा रचून हल्ला केला होता. यात तीन जवान शहीद झाले होते तर, तीन जवान जखमी झाले होते. मागच्या शनिवारी कामलेंगचिंग गावात झालेल्या चकमकीत लष्कराने एनएससीएन-के च्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते









