
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर व्हायला काही तासांचा अवधी उरला आहे. अनेक अंगांनी वैशिष्टयपूर्ण ठरलेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दोन दशकानंतर महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवल्याने राज्यात कोणाची किती ताकत आहे ते स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे ४८ तास उरले असताना, युती-आघाडी तुटली आणि वर्षानूवर्षाचे मित्र स्पर्धक म्हणून परस्परांसमोर उभे ठाकले.
प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचे मुद्दे बाजूला सरल्याचे दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात वीसहून जास्त सभा झाल्या. यापूर्वीचे पंतप्रधान एका राज्याच्या निवडणुकीत कधीही इतके सक्रीय झाले नव्हते.
पंचरंगी लढत असलेल्या महाराष्ट्रात मतदार कुठल्या एकापक्षाच्या हाती सत्तेच्या चाव्या सोपवणार की, पुन्हा युती-आघाडी करण्याचा कौल देणार ते उद्या स्पष्ट होईल.
महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी रविवार १९ ऑक्टोबरला होणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघ आणि हरयाणातील ९० मतदारसंघात पार पडलेल्या मतदानाची मोजणी प्रक्रिया रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु होईल.
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्टात ६३.१३ टक्के मतदान झाले तर हरयाणात ७६.५४ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. महाराष्ट्रातील २८८ केंद्रांवर ही मतमोजणी पार पडणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासोबत १५ ऑक्टोबरला बीड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान झाले होते. त्याचाही निकाल रविवारीच स्पष्ट होणार आहे.
दोन दशकानंतर राज्यात प्रथमच सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली. भाजपने या निवडणुकीत २८० उमेदवार तर बसपा २६०, सीपीआय ३४, सीपीएम १९, काँग्रेस २८७, राष्ट्रवादी २७८, शिवसेना २८२ आणि मनसेने २१९ उमेदवार रिंगणात उतरवले होते. २८८ जागांसाठी सुमारे चार हजार ११९ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.
हरयाणातीलही ९० जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर होणार आहेत. रविवारी दुपारी अथवा संध्याकाळपर्यंत हरयाणतील निकालाचे चित्र स्पष्ट होईल. ९० केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत हरयाणातील एक हजार ३५१ उमेदवार रिंगणात होते. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सर्व विधानसभा मतदारसंघातून आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते तर आयएनएलडीने ८८ उमेदवार, बसपाचे ८७, एचजेसी ६५, सीपीएम १७, सीपीआय १४, २९७ नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार तर ६०३ अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली.
२००९ मधील हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ४० जागांवर विजय मिळवला होता. तर आयएनएलडीने ३१, भाजप ४, एचजेसीने सहा, एसएडी आणि बसपाने प्रत्येकी एक तर सात अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला होता.









