
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भाजप व राष्ट्रवादीवर टीका
मुंबई – विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावरील अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून चुकीचा पायंडा पाडण्यात आला आहे. हा प्रस्ताव म्हणजे केवळ खुर्चीच्या हव्यासापोटी नितीशून्य व लोकशाहीतील संकेतांचे वस्त्रहरण करणारे राजकारण असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
अविश्वास प्रस्तावानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शिवाजीराव देशमुखांसारख्या निष्कलंक, कर्तव्यदक्ष व ज्येष्ठ नेत्याबाबत झालेले राजकारण अत्यंत दुर्देवी आहे. विधान परिषदेचे सभागृह राजकारण करण्यासाठी नव्हे तर राजकीय चौकटीच्या पलिकडे जाऊन राज्याच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी स्थापन झाले आहे. त्यामुळेच 1999 मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर देखील तत्कालीन सभापती श्री.ना.स. फरांदे यांनी 2004 पर्यंतचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला होता, याचे स्मरणही खा. अशोक चव्हाण यांनी करून दिले.
राष्ट्रवादी सातत्याने संख्याबळाची भाषा करीत असल्याने काँग्रेसने त्यांना सभापती तर काँग्रेसला उपसभापती पद, असा प्रस्ताव दिला होता. परंतु, राष्ट्रवादीला भाजपसोबतच जायचे असल्याने त्यांनी हा प्रस्ताव अमान्य केला. यामुळे भाजप व राष्ट्रवादीची आघाडी पुन्हा एकदा उघड झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे पूर्ण निकाल जाहीर होत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला विनाअट पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भविष्यात राष्ट्रवादीचे राजकारण कोणत्या दिशेने असेल आणि त्यांना काय साध्य करायचे आहे, ते या निमित्ताने जनतेसमोर उघड झाल्याची टीकाही त्यांनी केली. सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे अर्थात काँग्रेसच्या मित्रपक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी काँग्रेसने सहकार्याची भूमिका घेतली होती. त्याची आज राष्ट्रवादी काँग्रेसने ‘चांगली’ परतफेड केल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.









