
नवी दिल्ली – संपूर्ण देशात गाजलेल्या नितीश कटारा हत्याकांड प्रकरणातील तिघा दोषींना सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्याचा निकाल बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. ही हॉनर किलिंगमधुन झालेली हत्या असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
विकास यादव, विशाल आणि सुखदेव यादव यांच्या शिक्षेवर २५ एप्रिलला सुनावणी होणार आहे. उत्तर प्रदेशातील प्रभावशाली नेते डी.पी.यादव यांचा मुलगा विकास यादव, त्याचे भाऊ विशाल, आणि सुखदेव या तिघांनी नितीश कटाराचे अपहरण करुन त्याची हत्या केली होती.
नितीश कटाराचे विकास यादवची बहिणी भारती यादव बरोबर प्रेम प्रकरण सुरु होते. या प्रेमाला यादव कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे १६ फेब्रवारी २००२ च्या रात्री नितीशचे अपहरण करुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. २००८ मध्ये सत्र न्यायालयाने या हत्ये प्रकरणी तिघांना दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेला तिघांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. दोषींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी नितीश कटाराची आई निलम कटारा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.









