
पाटणा – बिहारचे बंडखोर मुख्यमंत्री जीवनराम मांझी यांना दूर करत बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा नितीश कुमार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय जदयूच्या (सं.) विधिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
नितीश कुमार यांची जदयूच्या (सं.) विधिमंडळ पक्ष नेतेपदी शनिवारी निवड झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री मांझी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री जीवनराम मांझी आणि नितीश कुमार यांच्यात तडजोडीचे प्रयत्न फसले. त्यानंतर बिहारमध्ये शनिवारी मोठय़ा प्रमाणावर राजकीय हालचाली झाल्या. या घटनेनंतर जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी पक्षाची तातडीची बैठक बोलवली. या बैठकीत नितीश कुमार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. आमदार पाठीशी नसल्याने मांझी यांचे बंड आपोआप थंड झाले.
मुख्यमंत्री जीवनराम मांझी यांना पदावरून दूर करण्याचे पक्षाने ठरवले. त्यानंतर मुख्यमंत्री मांझी यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलवली. त्यात त्यांनी बिहार विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत त्याला नितीश कुमार यांच्या २१ समर्थक मंत्र्यांनी कडाडून विरोध केला.
दरम्यान, नितीश कुमार हे लवकरच राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. कुमार यांच्याकडे बहुमत असून गरज असल्यास आमदारांची ओळख परेड करण्यात येईल, असे अर्थमंत्री बीजेंद्र यादव यांनी सांगितले.
आमदारांना संबोधित करताना नितीश कुमार म्हणाले की, भाजपाच्याघाणेरडय़ा राजकारणाचे आव्हान मी स्वीकारले आहे. आम्ही आघाडीवर राहून भाजपाचा मुकाबला करणार आहोत. सध्या लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेला पक्ष लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवताना दिसत आहे. आमदारांनी पाटण्यात उपस्थित राहून त्यांच्या विरोधातील खोटय़ा आरोपांचा समर्थपणे तोंड द्यावे, असेही ते म्हणाले.









