
माहुर (नांदेड), दि. १८ – विदर्भ-मराठवाड्याच्या सिमेवरील बहुचर्चीत निम्न पैनगंगा प्रकल्पात शेतजमिन गेलेल्या शेतकºयाची ७ लाखाने फसवणूक केली आहे. या प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व सरपंचाविरूद्घ गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने मांडवी पोलिसांना दिले आहे. त्यावरून पोलिसांनी खंबाळ््याचे माजी सरपंच तथा किनवट बाजार समितीचे उपसभापती बळीराम दुलसिंग राठोड (४०), माजी सरपंच गणपत अमरसिंग आडे (५५) याच्याविरूद्घ गुन्हे दाखल केले.
निम्न पैनगंगा प्रकल्पाची मुख्य भिंत ही खंबाळा गावात असून तीन वर्षापासून काम सुरू झाले आहे. येथील शेतकरी बाब्या जाब्या राठोड यांची ४ एकर ०.७ आर शेती या प्रकल्पाच्या भिंतीमध्ये गेली आहे. त्या मोबदल्यात शेतकºयाला ७ लाख ८ हजार ३४३ रुपये १९ मार्च २००९ रोजी भारतीय स्टेट बँक शाखा मांडवी येथील खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर बाजार समितीचे उपसभापती बळीराम राठोड, माजी सरपंच गणपत आडे या दोघांनी संगणमत करून शेतकºयांस भूलथापा देऊन तुमच्या नावे एवढी रक्कम जमा राहील्यास सरकारला कर द्यावा लागणार म्हणून तुम्ही एवढी रक्कम जमा ठेऊ नका असे सांगितले. त्यानंतर बॅकेतून स्वत:च्या खात्यात सात लाख रुपये वर्ग करून घेतले. सात लाख रुपयाचे पाच वर्षात दुप्पट पैसे देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र सहा वर्ष होऊनही डिपॉझीटची पावती व पैसे मिळाले नाही. त्यामुळे शेतकºयाने मांडवा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली मात्र पोलीसांनी धुडकावून लावले होते. शेवटी शेतकºयाने किनवट येथील प्रथमश्रेणी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यात मांडवी येथील स्टेट बँकेचे सुनील नुरसिंग राठोड, अशोक भाटु राठोड यांनी साक्ष ग्राह्य धरण्यात आली. न्यायालयाने बळीराम राठोड व गणपत आडे याच्याविरूद्घ फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश मांडवी पोलिसांना दिले असून गुन्हा दाखल करण्यात आला.









