
काठमांडू- नेपाळसह उत्तर भारताला हादरवून सोडणा-या भूकंपामुळे आतापर्यंत तीन हजार सातशे जणांचा बळी गेला आहे तर ६५०० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती नेपाळच्या आपत्ती निवारण विभागाचे प्रमुख रामेश्वर दंगल यांनी दिली. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे.
डोंगर आणि द-याखो-यांमध्ये वसलेली २००. ३०० आणि १००० लोकसंख्या असलेली संपूर्ण गावेच्या गावे मातीच्या ढिगा-याखाली गाडली गेली आहेत. येथे जाण्यासाठी रस्तेही राहिले नाहीत. या भागात हेलिकॉप्टरमधून पाहणी केली असता हे भीषण वास्तव समोर आल्याचे पोलीस उप महानिरीक्षक कोमल सिमग बाम यांनी सांगितले.अजूनही ढिगा-याखाली हजारो लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे मदतकार्य सुरु असतानाच रविवारी रात्री पाऊस कोसळू लागल्याने मदतकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. वारंवार धक्के जाणवत असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जगभरातून मदतीचा ओघ सुरू आहे.नेपाळमध्ये रात्रीपासून पाऊस सुरू झाला आहे. पुढील ४८ तास पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. दरडी कोसळण्याचीही शक्यता आहे.









