
नवी दिल्ली – अमेरिकेत झालेल्या आयएसएसफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात भारताच्या मानवजीत सिंह संधूने अचूक निशाणा साधत सुवर्णपदक पटकावले. त्याने दोनवेळच्या ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या मायकल डायमंडवर मात केली.
मानवजीतने पात्रता फेरीत १२१ आणि अंतिम फेरीत १३ गुणांची कमाई करुन सुवर्णपदक पटकावले. डायमंडने पात्रता फेरीत ११९ आणि अंतिम फेरीत नऊ गुणांचा कमाई केली. उपांत्यफेरीत मानवजीतने पंधरापैकी १४ वेळा लक्ष्यभेद केला. रशियाच्या अलेक्सी आलीपोव्हला कास्यपदक मिळाले. त्याने १२१ आणि १२ गुणांची कमाई केली.
जगातल्या सर्वोत्तम नेमबाजांमध्ये स्पर्धा होती. मायकल डायमंड सारख्या प्रतिस्पर्ध्या विरुध्द सामना जिंकणे एक आव्हान होते. मात्र मी अचूक लक्ष्य भेद केला. हिवाळी हंगामात मी या विश्वचषक स्पर्धेची तयारी केली होती असे विजयानंतर मानवजीतने सांगितले.२०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये मानवजीतकडून पदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र त्याला अंतिम फेरीत प्रवेश करता आला नव्हता. पात्रता फेरीत त्याला १६ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.









