नेर नगराध्यक्षपदी सेनेचे पवन जयस्वाल, तर उपाध्यक्षपदी मोहन भोयर

नेर : नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे पवन श्यामलाल जयस्वाल तर उपाध्यक्षपदी अपक्ष मोहन गोविंद भोयर यांची निवड झाली आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून सेनेचे भाऊराव ढवळे आणि राकॉंचे इरफान अकबानी यांची निवड झाली.

निवडणूक उपजिल्हाधिकारी ज्ञानेश भट आणि मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या उपस्थितीत या पदांसाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे पवन जयस्वाल आणि उपाध्यक्षपदासाठी अपक्ष मोहन भोयर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. राकॉं व कॉंग्रेसतर्फे नगराध्यक्ष पदासाठी सुभाष भोयर तर कॉंग्रेसचे म.महेफूज यांनी उपाध्यक्ष पदासाठी नामांकन भरले. मात्र शिवसेनेचे संख्याबळ ११ असल्याने जयस्वाल आणि भोयर विजयी झाले.

राकॉंचे सुभाष भोयर व म.महेफूज यांना ७ मते मिळाली. लगेचच स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. सेनेतर्फे भाऊराव ढवळे तर राकॉं तर्फे इरफान अकबानी यांची निवड झाली.

पदाधिकारी निवडीनंतर शिवसेनेतर्फे विजयी मिरवणूक काढण्यात आली. नेर शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.या नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने दहा जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवत भगवा फडकाविला होता. आज पवन जयस्वाल यांची नगराध्यक्षपदी निवड होताच ढोलताशाच्या गजरात फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


2 × = twelve