पतीनेच केला पत्नी व चिमुकलीचा खून , मायलेकीची आत्महत्या घातपात

index.jpeg00

यवतमाळ, दि. १० (प्रतिनिधी) – येथून जवळच असलेल्या भोसा येथे महिलेने आपल्या एक वर्षीय चिमुकलीसह आत्महत्या केल्याची घटना काल घडली. मात्र ही आत्महत्या नसून पतीनेच पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केला अन् चिमुकलीलाही विहीरीत फेकुन दिल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी वडगावरोड पोलिसांनी आरोपी शांताराम राऊत यास ताब्यात घेवून खूनाचा गुन्हा नोंदविला आहे.
भोसा येथील अर्चना शांताराम राऊत (२८), निधी शांताराम राऊत (१) रा. भोसा या मायलेकीनी काल मंगळवारी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. वडगावरोड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरू केल्यानंतर सुरूवातीपासूनच याप्रकरणात शांतारामवर पोलिसांचा संशय होता. अर्चनाचा मृतदेह शविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविल्यानंतर रात्री वैद्यकीय सुत्रांनी अर्चनाचा गळा आवळून तर निधीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर संशयाप्रमाणे शांतारामनेच खून केल्याचे समोर आले. अकोला बाजार नजिक असलेल्या पहूरनरखेडे येथील शांताराम राऊत (३०) हा यवतमाळ येथे पंधरा वर्षापासून किरायाच्या खोलीत राहत होता. आठ दिवसापुर्वीच त्याने भोसा येथे किरायाने खोली घेतली होती. दरम्यान त्याचा अर्चनाशी सतत वाद सुरू होता. या वादातच त्याने अर्चनाचा दोरीने गळा आवळून खून करून तिचा मृतदेह व १ वर्षीय निधीला परीसरातीलच विहिरीत फेकून दिले. त्यानंतर बाहेरगावी असल्याचे दाखवित घरी आल्यानंतर पत्नी व मुलगी बेपत्ता झाली म्हणून शोधाशोध घेण्याचा बनाव केला. पोलीस तपासात हे उघड झाल्यानंतर पोलिसांनी शांतारामला ताब्यात घेवून अटक केली आहे. मात्र शांतारामने अद्यापही पोलिसांपुढे गुन्ह्याची कबूली दिली नसल्याने पोलीस शांतारामचा पिसीआर मिळविण्यासाठी उद्या त्याला न्यायालयात हजर करणार आहे. त्याने खून का केला याचा अद्यापही उलगडा झाला नसला तरी त्याच्या या कृत्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× eight = 24