
नवी दिल्ली: पत्ते खेळणे हे करमणुकीचे साधन किंवा जुगारी खेळ मानावे हे केंद्र सरकारचे म्हणणे अमान्य करून सर्वोच्च न्यायालयाने पत्ते खेळणे हा शारीरिक खेळ असल्याचे जाहीर केले आहे.
सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तु यांच्या खंडपीठाने म्हटले की, पत्ते खेळताना हातांचा वापर केला जातो, त्यामुळे ते शारीरिक खेळाच्या प्रकारातही मोडू शकते.
न्यायालयाने हा निकाल पत्त्यांचे जोड उत्पादित करणाऱ्या उत्पादकांवर किती दराने उत्पादन शुल्क आकारायचे या संबंधीच्या वादात न्यायालयाने अलीकडेच हा निकाल दिला. शारीरिक खेळांसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांच्या उत्पादनावर पाच टक्के अशा सवलतीच्या दराने उत्पादन शुल्क आकारले जाते. शारीरिक श्रमाविना खेळल्या जाणाऱ्या खेळांच्या क्रीडासाहित्यावर एक टक्का जास्त म्हणजे सहा टक्के दराने उत्पादन शुल्क आकारले जाते.
केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल रोहटगी यांचे असे म्हणणे होते की, पत्ते खेळणे हा काही शारीरिक श्रमाचा खेळ नाही. त्यामुळे हा खेळ खेळण्यासाठी वापरला जाणारा पत्त्यांचा जोड हा ‘क्रीडासाहित्य’ या प्रकारात गणला जाऊ शकत नाही. परिणामी त्याला उत्पादन शुल्काचा सवलतीचा दर लागू होऊ शकत नाही. गेमिंग पार्लरमध्ये खेळल्या जाणाऱ्या पिन टेबल्स, बिलियर्ड्स किंवा कसिनो यासारख्या करमणुकीच्या किंवा जुगारी खेळांप्रमाणे पत्ते हा खेळ आहे, असे रोहटगी यांचे म्हणणे होते. कंपनीचे वकील अॅड. व्ही. लक्ष्मी कुमारन यांचे म्हणण असे होते की, सरकारची ही व्याख्या मान्य केली तर बुद्धिबळालाही खेळ म्हणता येणार नाही. न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य केले.









