पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री

download (1)

ई माध्यमांनाही पुढे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण

यवतमाळ, दि ६ : विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांची सामाजिक सुरक्षा महत्वाची आहे. त्यादृष्टीकोनातून राज्य शासनाने पावले उचलली असून पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर पुढील वर्षासाठीच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांमध्ये ई-माध्यमांसाठी स्वतंत्र पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्य शासनाच्या लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार तसेच उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट, माहिती व जनसंपर्क सचिव मनिषा म्हैसकर, महासंचालक चंद्रशेखर ओक, लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार विजेते लक्ष्मण जोशी, विजय कुवळेकर, दिनकर रायकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे वृत्त संचालक शिवाजी मानकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आपल्याला ज्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो त्यामुळे त्या पुरस्काराची आणि पुरस्कारार्थीची उंची वाढत असते. लोकशाहीला सुदृढ करण्याचे काम माध्यमं करीत असल्याने लोकशाहीमध्ये माध्यमांचे महत्व अधोरेखीत होते. त्यामुळे जबाबदारीतही वाढ होते. हल्लीचा काळ हा बातमी मुल्याचा आहे. मात्र ते करीत असतांना पत्रकारीतेतील शाश्वत मुल्यांची जपणूक करणे महत्वाचे आहे. पत्रकार हा कधीच पुरस्कारासाठी काम करीत नसतो. आपल्याला मिळणारे पुरस्कार हे स्वमुल्यमापनासाठी असतात. आपण ज्या मार्गाने वाटचाल करीत आहोत तो मार्ग योग्य आहे हे मिळालेल्या पुरस्काराने शिक्कामोर्तब होते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पत्रकारितेचे व्रत जोपासताना पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेची जबाबदारी महत्वाची आहे. त्यासाठी राज्य शासनाने पत्रकारांना पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत ज्येष्ठ पत्रकारांच्या सुचना विचारात घेऊन एक समग्र योजना तयार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात माध्यमांचे स्वरूप बदलले असून आता सोशल मिडीया आणि ई- माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या नविन माध्यमांनी लोकांपर्यंत पोहच वाढविली आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांमध्ये ब्लॉग, वेबसाईट तसेच अन्य ई माध्यमांसाठी एक स्वतंत्र पुरस्कार देण्यात येईल. 2014 या वर्षाचे पुरस्कार आम्ही याच वर्षी प्रदान करू आणि पुढील वर्षापासून पत्रकारिता पुरस्कारासाठी नामनिर्देशनाची सोय देखील करण्यात येईल. याद्वारे एखादा पत्रकार किंवा व्यक्ती अन्य दुसऱ्या पत्रकाराचे पुरस्कारासाठी नामनिर्देशन करु शकेल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार विजेते लक्ष्मण जोशी, विजय कुवळेकर, दिनकर रायकर, सचिव मनिषा म्हैसकर यांचीही भाषणे झाली.प्रास्ताविक महासंचालक ओक यांनी केले. दीपप्रज्वलन आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनाने समारंभास सुरूवात झाली. सोहळ्यास आमदार सुरेश खाडे, संचालक (प्रशासन) देवेंद्र भुजबळ, पुरस्कार निवड समितीचे सदस्य, माध्यम प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी तसेच पुरस्कारार्थी पत्रकारांचे कुटुंबिय उपस्थित होते. संचालक शिवाजी मानकर यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four − 1 =