अमरावती – अमरावती जिल्ह्यातील परतवाडा भागातील वृंदावन फॅशन या कपडयाच्या दुकानाला रविवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत होरपळून सात जणांचा मृत्यू झाला.
मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. मृतांमधे दोन मुलं आणि दोन महिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. परतवाडयातील टिळक चौक भागात हे दुकान आहे.या दुकानात ओटवाल कुटुंब रहात होते. दुकानात आग भडकली तेव्हा सर्वजण गाढ झोपेत असल्याचा अंदाज आहे. झोपेत असताना, आगीच्या ज्वाळांनी वेढल्याने सर्वांचा होरपळून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. आगाचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलिस आणि अग्निशमन दल आगीच्या कारणांचा शोध घेत आहेत.









