
यवतमाळ दि. ६: राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये ई-बँकींगची सेवा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून दि. १० फेब्रुवारी रोजी कळंब तालुक्यातील परसोडी ग्रामपंचायतीत सकाळी १० वाजता या सेवेचे राज्यस्तरीय उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होत आहे. याच दिवशी जिल्ह्यात २०० ग्रामपंचायतींमध्ये या सेवेचा शुभारंभ होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री जयंत पाटील राहणार आहेत. तसेच अन्य मंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहे. ग्रामविकास विभागाने महाऑनलाईन केंद्र शासन मान्यताप्राप्त सी.एस.सी- एस.पी.व्ही या कंपनीशी त्रिपक्षीय करार केला आहे. या कंपनीने देशातील राष्ट्रीयकृत बँकांबरोबर करार केला असून आता टप्प्याटप्प्याने बँक शाखा नसलेल्या राज्यातील सर्व ऑनलाईन ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे नागरिकांना बँक व्यवहारांसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही तर बँकच ग्रामपंचायतीत येणार आहे.
ई-पंचायत कार्यक्रमात महाराष्ट्र देशात पहिले असून ई-बँकिंग सुविधेद्वारे बँकेत खाते उघडणे, पैसे भरणे, पैसे काढणे, ड्राफ्ट बनवणे, पैसे हस्तांतरित करणे, कर्ज प्रस्ताव करणे, लाभार्थ्यांना थेट अनुदान वितरित करणे इ. प्रकारच्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. संग्राम कक्षामार्फत वीज, फोन, मोबाईलचे देयक भरणे, रेल्वे-बस आरक्षण करणे, मोबाईल रिचार्ज करणे यासारख्या बहुविध सुविधा देखील ई-बँकिंग सुविधेद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्रामपंचायतींमध्ये यापुर्व सुरू करण्यात आलेल्या विविध सेवांमुळे २१ हजार रोजगारसंधीं निर्माण झाल्या आहेत. एकसमान माहिती तंत्रज्ञान सेवा देण्यात राज्याचा ग्रामविकास विभाग देशात पहिला आहे. ग्रामविकास विभागामार्फत विविध प्रकारच्या २० संगणकीय आज्ञावल्या उपयोगात आणल्या जात असून याद्वारे गावपातळीवरची मुलभूत माहिती संकलित होत आहे. यातून एकप्रकारे ग्रामीण महाराष्ट्राचा माहितीकोशच आकाराला येत असून गाव विकासाचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन करण्याच्यादृष्टीने माहितीचे हे संकलन अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
ग्रामपंचायतींमध्ये ई-बँकिंगची सोय उपलब्ध करून दिल्याने ग्रामपंचायतींनाही काही रक्कम सेवाशुल्क स्वरूपात मिळणार आहे. तसेच १ एप्रिल २०१३ पासून शासनाने ग्रामपंचायतींमार्फत देण्यात येणारे १९ प्रकारचे दाखले संगणकीकृत स्वरूपात देण्याचे बंधनकारक केले आहे. यातूनही ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढले आहे. यवतमाळ जिल्ह्यात ही सेवा उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य नागरीकांना बँकींग सुविधा सहजपणे गावातच उपलब्ध होणार आहे. परसोडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शुभारंभाची तयारी प्रशासनाच्यावतीने जोरात सुरू आहे.









