पुसद (यवतमाळ), दि. १७ – स्वाईन फ्लू आता जिल्ह्यात पाय पसरत असून, येथील महिला रुग्णाचा नागपूर येथे उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. आशा अजय चव्हाण (४०) रा. जवाहन कॉलनी, श्रीरामपूर असे मृत महिलेचे नाव आहे.
आशा चव्हाण ही महिला आजारी पडल्यानंतर उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने नागपूर येथे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सदर महिला स्वाईन फ्लूने आजारी असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यावरून त्यांनी स्वॉब नमूने घेवून तपासणीसाठी पाठविले. यात प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटीव्ह आला. स्वाईन फ्लूचा उपचार सुरू असतानाच आज सकाळी आशा चव्हाण या महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. पुसद शहरातील महिलेचा नागपुरात स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची वार्ता शहरात पसरताच खळबळ उडाली आहे. शहरात स्वाईन फ्लू पाय पसरत असल्याची धास्ती पुसदकरांना सतावत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.









