पोलीस ठाण्याच्या मालखान्यातून ४१ लाख चोरी

11
यवतमाळ, दि. १४ – साडेतीन महिन्यापूर्वी हवाल्यासाठी आलेली ४१ लाख रुपये रक्कम वडगाव रोड पोलिसांनी जप्त केली होती. मालखान्यात असलेली सदर रक्कम ठाण्यातीलच पोलीस शिपायाने चोरून नेल्याचा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. या प्रकाराने ठाणेदारासह वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या पायाखालची वाळू सरकली असून पोलीस वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.
निर्मल उत्तम राठोड (३६) रा. पोलीस निवासस्थान पळसवाडी कॅम्प असे पोलिस शिपायाचे नाव असून तो वडगाव रोड ठाण्यात कार्यरत आहे. हेड मोहरर अशोक पत्रकार यांचा तो मदतनीस म्हणून काम करीत होता. जिग्नेश रसिकभाई पटेल (२१) रा. ग्रीनपार्क सोसायटी मैसान (गुजरात) ह.मु. रायली प्लॉट अमरावती याला २९ जानेवारी २०१५ रोजी रात्री येथील बसस्थानकावर अटक केली होती. संशयास्परित्या फिरणाºया सदर आरोपीजवळील बॅगची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये तब्बल ४१ लाख ६६ हजार ६०० रुपयांची बेहिशेबी आढळून आलेली रोकड जप्त वडगाव रोड पोलिसांनी जप्त केली होती. तेव्हापासून सिल केलेली रक्कम वडगाव रोड पोलिस ठाण्यातील मालखान्यात ठेऊन होती. या मालखान्यातील साहित्य नवीन इमारतीमध्ये ठेवायचे असल्याने ठाणेदार बाळकृष्ण जाधव यांनी बुधवारी सायंकाळी तेथील पाहणी केली असता सदर रक्कम दिसली नाही. त्यामुळे त्यांनी बुधवारी सायंकाळी हेड मोहरर पत्रकार यांना सदर रक्कम शोधण्याचे सांगितले. त्यावरून मालखान्यातील साहित्याची शहानिशा केली असता सदर रक्कम ठेऊन असलेल्या पेटीचे कुलुप तुटल्याचे दिसले. त्यामुळे ही रक्कम चोरी गेल्याचे उघड झाले. या प्रकाराने ठाणेदारासह पोलीस कर्मचाºयांच्या पायाखालील वाळू सरकली. तसेच मदतनीस निर्मल हा चार दिवसापासून रजा न घेता गैरहजर असल्याचे उघड झाले. हा गंभीर प्रकार असल्याने ठाणेदार व डी.बी. पथकाने या शिपायाची शोधमोहीम सुरू केली. रात्री १ वाजताच्या सुमारास निर्मलला वडील सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक उत्तम राठोड यांच्या आनंदवाडी नेर येथील घरून ताब्यात घेतले. रात्रभर त्याची बंदद्वार चौकशी केल्यानंतरही तो काहीही सांगण्यास तयार नव्हता. जर पैसे नेले असतील तर परत दे आपण प्रकरण मॅनेज करू असेही त्याला सांगण्यात आले. तरीही त्याने पैसे चोरल्याची कबुली दिली नाही. शेवटी आज गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखेने पोलीसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन संपुर्ण कसब पणाला लावून सदर शिपायाला पैलावर घेतले. त्यानंतर त्याने आपणच पैसे चोरल्याची कबुली दिली. यावेळी अपर पोलीस अधिक्षक जानकीराम डाखोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार, वडगाव रोडचे ठाणेदार बाळकृष्ण जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग मिराशी, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुगत पुंडगे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी निर्मल राठोड याच्याविरूद्घ गुन्हा दाखल केला. या शिपायाने यापूर्वीही पोलीस ठाण्यातील मालखान्यातून तीन ते चार वेळा कोणालाही सुचना न देता २०-२० हजार रुपये चोरून नेले. हा प्रकार उघड होताच त्याने सदर रक्कम भरून दिली होती. तेव्हाच या शिपायावर कारवाई झाली असती तर ही वेळ आली नसती. पोलीस शिपायी निर्मल राठोड याने दारव्हा तालुक्यातील जवळा ब्रम्हणाथ येथे राहणारे सासरे शेषराव चव्हाण यांच्या घरी चोरी केलेली रक्कम नेऊन ठेवल्याची कबुली पोलिसां समक्ष दिली. घरामध्ये एका खोलीत मोठ्ठा गड्डा करून त्यामध्ये पैसे पुरले. त्यावर ज्वारीने भरून असलेले पोते ठेऊन गड्डा बुजविल्याचेही त्याने सांगितले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जवळा ब्रम्हणाथ येथे जाऊन गड्डा खोदून रक्कम बाहेर काढली. यावेळी पोलिसांनी ३९ लाख १० हजार ६०० रुपये जप्त केली असून उर्वरीत ३ लाख ५६ हजार रुपये गायब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 − four =