
पालघर- पालघर जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाने एका विधवा महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी रत्नाकर उगलमुगले या पोलीस शिपायावर तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तारापूर येथे वास्तव्यास असलेली ही विधवा महिला उदरनिर्वाहासाठी स्वयंपाक आणि जेवणाचे डबे बनवून देते. यातून तारापूर येथे राहणारा पोलीस शिपाई रत्नाकर याच्याशी तिची ओळख झाली. रत्नाकरने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते.
ही महिला एकटी रहात असल्याचा गैरफायदा घेऊन रत्नाकरने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आणि नंतर लग्न करण्यास नकार दिला. तसेच या प्रकाराची कोठेही वाच्यता केल्यास तो स्वत: पोलीस असल्याने आपले कोणी काही वाकडे करु शकत नाही, अशी बोलून मारण्याची धमकीही दिली होती.
त्यानंतर मागिल २० ते २५ दिवस त्याने तिच्यावर सतत अत्याचार केल्यामुळे तिची प्रकृती ढासळली. त्यामुळे तिला पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रत्नाकर विरोधात तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी सांगितले.









