
नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यादरम्यान येत्या प्रजासत्ताकदिनी भारतात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असून शाळा, लष्करी छावण्या, हायवे आणि नागरी वस्त्या हे दहशतवाद्यांचे प्रमुख लक्ष्य असू शकते,’ असा गंभीर इशारा लष्कराने दिला आहे.
लष्कराच्या १६ कॉर्प्स विभागाचे लेफ्टनंट जनरल के. एच. सिंग यांनी दहशतवाद्यांच्या संभाव्य घुसखोरीची माहिती दिली. ‘पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांचा वावर आणि प्रशिक्षण अद्याप सुरूच असल्याचे हे लष्करप्रमुखांनी सांगितलेच आहे. आता तर तब्बल २०० दहशतवादी पीर पंजालच्या डोंगर भागातून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, पाकिस्तानी घुसखोरी हाणून पाडण्यासाठी लष्कर पूर्ण तयार असून असा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल,’ असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला.
ओबामा यांच्या भेटीदरम्यान भारतीय सीमेवर व देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट ठेवण्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. दरम्यान, काश्मीरमध्ये घुसलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन आत्मघाती दहशतवाद्यांचा गुप्तचर संस्थांकडून शोध सुरू आहे.









