फलोत्पादन अभियानाच्या शेडनेटने आणली समृध्दी , काकडी, टोमॅटोचे उत्पादन

unnamed
यवतमाळ, दि. २९ आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने कृषी उत्पादनात कमालीची वाढ होवू शकते, हे आता जवळजवळ प्रत्येकच शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अत्याधुनिक साधनांसह शेडनेटसारख्या बाबींचा वापर करतांना दिसत आहे. बाभुळगाव तालुक्यातील बोरगाव भिलुक्षा या गावातील एका शेतकऱ्याने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातुन उभारलेल्या शेडनेटने आपल्या शेतात समृध्दीचा मळा फुलविला आहे.
निसर्गाचा लहरीपणा आणि सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पारंपारिक पिकांना मोठ्याप्रमाणावर फटका सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या भाजीपाला पिकाशिवाय पर्याय राहिलेला नाही, हीच बाब बाभुळगाव तालुक्यातील बोरगाव भिलुक्षा येथील शेतकरी प्रमोद डफळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली शेती फळपिकाकडे वळविली. डफळे हे उच्च शिक्षीत शेतकरी असून आपल्या शेतीसच त्यांनी शिक्षणाची जोड दिली आहे. आत्मा योजनेतंर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी फळपिकांचा अभ्यास दौरा केला होता. त्याप्रमाणे फळपिक घेण्याचे त्यांनी ठरविले होते. त्यासाठी शेडनेट चांगले माध्यम असल्याने त्यांनी आपल्या 30 आर क्षेत्रावर शेडनेटची उभारणी केली.
सन 2012 मध्ये कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन अभियानातंर्गत शेडनेटसाठी त्यांना 50 टक्के अनुदान मिळाले. शेडनेटमुळे पिकांना लागणारे वातावरण नियंत्रित करता आले. खुप जास्त व कमी तापमान तसेच पावसापासून पिकांचे संरक्षण करण्यासोबतच हंगामाशिवायही शेडनेटमुळे पिके घेता येणे शक्य झाल्याने त्याच आर्थिक समृध्दीकडे वाटचाल करीत आहे.
श्री.डफळे यांनी पहिल्यावेळी शेडनेटमध्ये टोमॅटोचे उत्पादन घेतले. त्यानंतर त्यांनी काकडीची लागवड केली. सध्या काकडी पिकाचे दुसरे उत्पादन ते घेत आहे. या पिकासाठी त्यांना 50 हजाराचा खर्च आला तर 15 दिवसात त्यांना 1 लाख 25 हजाराचे उत्पन्न मिळाले. दोन महिन्यामध्ये त्यांना काकडी पिकापासून एकूण 3 लाख 50 हजार रुपये इतके उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. काकडीचे उत्पादन ते यवतमाळच्या बाजारपेठेत करतात. काकडीसोबतच डाळींब, संत्रा व चारापिकेही ते घेतात. त्यांच्याकडे 30 जनावरे असून त्यात 15 जरसी गायींचा समावेश आहे. काकडीच्या यशस्वी प्रयोगानंतर कारले व पालकाचे उत्पादन शेडनेटमध्ये घेणार असल्याचे ते सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ seven = 14