
फेसबुक जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया वेबसाइट आहे. अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत, फ्रान्सपासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत, भारतापासून जपानपर्यंत सर्व जण फेसबुकचे वेडे आहेत. पण, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच. त्यामुळे जगाच्या काही दुर्गम भागात इंटरनेट पोहोचलेले नाही. त्यामुळे फेसबुक कंपनीने संपूर्ण पृथ्वीतलावर इंटरनेट पोहोचवण्यासाठी चक्क आकाशमार्गाचा सहारा घेण्याचे ठरवले आहे. विमाने, ड्रोन आणि उपग्रहांवर एक विशेष प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. त्याद्वारे जगभरात इंटरनेट पोहोचवण्याचा मानस फेसबुकने केला आहे.
जगातील सर्व व्यक्तींना आकाशातून इंटरनेट देण्याचे स्वप्न आम्ही साकारणार आहोत. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी फेसबुक कंपनी इंटरनेट. ऑर्गच्या सहाय्याने ‘कनेक्टिव्हिटी लॅब’ उभारत आहे. या नवीन तंत्रज्ञानाने संपूर्ण जग नक्कीच जोडले जाईल, असे फेसबुकचा सहसंस्थापक-प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले.
ही ‘कनेक्टिव्हिटी लॅब’ बांधण्यासाठी अंतराळ विज्ञान आणि कम्युनिकेशन तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. यात नासातील जेट प्रोपल्शन लॅब अॅँड अॅम्स रिसर्च सेंटरच्या माजी अधिका-यांचाही समावेश आहे. जगातील दुर्गम भागात राहणा-या लोकसंख्येपर्यंत इंटरनेट पोहोचवण्यासाठी उपग्रहांचा वापर केला जाणार आहे. तसेच शहरांमध्ये राहणा-या नागरिकांना विमानातून इंटरनेटची सुविधा दिली जाणार आहे. ही विमाने वातावरणाच्या बाहेरून प्रवास करणार असून ती सौरऊर्जेवर चालणार आहे. ही विमाने महिनोनमहिने आकाशात राहू शकतात, असे फेसबुकचे अधिकारी येल मॅग्युरी यांनी सांगितले.
ही तर केवळ सुरुवात आहे. आमच्या टीममध्ये अनेक तज्ज्ञ व चांगली संकल्पना असलेले लोक आहेत. हे तंत्रज्ञान विकसित करण्यात काही अडचणी असून त्या निश्चितपणे दूर केल्या जातील, असेही मॅग्युरी यांनी सांगितले.









