बंदीजणांच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगारावर भर – पालकमंत्री संजय राठोड

_DSC0514
यवतमाळ , दि. २९ : कळत न कळत अनेकांकडून गुन्हा घडत असतो. अशा गुन्ह्यात काहींना बंदी व्हावे लागते. परंतु हे बंदीही शेवट माणूसच असतात. बंदी मुक्त झाल्यानंतर अशा व्यक्तींना समाजाकडून वाईट वागणूक मिळण्याची शक्यता असते. या व्यक्तींकडे वेगळया नरजेतून न पाहता स्वयंरोजगारांच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे व त्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात महिला व बालविकास विभागाच्यावतीने कारागृहातून मुक्त झालेल्या बंद्यांना त्यांच्या पुनर्वसनासाठी अर्थसहाय्यचे वितरण पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास कारागृहाचे अधीक्षक श्रीकृष्ण भुसारी, परमानंद अग्रवाल, तुरुंग अधिकारी श्री.भांबरे, शोभा बाविस्कर, ॲड.विनीत ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी कारागृहातून मुक्त झालेले वसंत नारायण मिलमिले, दिपक नारायण ससाने, चंद्रशेखर नारायण मुंदे, सलीम शाह मज्जीद शाह, सुरेश विठ्ठलराव एकोणकार यांना प्रत्येकी पाच हजार रूपयाच्या अर्थसहाय्यचे वितरण करण्यात आले. शासनाच्यावतीने बंदीबांधवांच्या पुनर्वसनासाठी देण्यात येत असलेली पाच हजाराची रक्कम कमी असून ही रक्कम वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री.राठोड म्हणाले. तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर बंदीबांधवांना पुनर्वसनासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, ते शासन व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी अभ्यास करणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.
एखादी व्यक्ती कारागृहात असतांना त्यांचे कुटुंब अडचणी असते. अशा कुटुंबांना मदत देण्यासंदर्भातही विचार केला जाणार आहे. कारागृहात बंदी मुक्त वातावरणात राहिल्या पाहिजे. त्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यावर भर राहणार असून कारागृह प्रशासनाने त्याबाबतीत अवगत करावे. बंद्यांना अडचणी असल्यास त्यांनी हक्काने सांगाव्यात. त्याची दखल घेतली जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
यावेळी परमानंद अग्रवाल यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक कारागृह अधीक्षक श्रीकृष्ण भुसारी यांनी तर संचलन धनंजय नंदपटेल यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांनी कारागृहातील स्वयंपाकगृहास भेट देवून तेथील भोजनव्यवस्थेची तसेच त्याच्या दर्जेची पाहणी केली. तसेच बंदी वास्तव्यास असलेल्या बॅरेक्स व तेथील सुविधांची माहिती घेतली. कार्यक्रमास जवळपास 250 ते 300 कैदी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− three = 4