
यवतमाळ , दि. १५ – भरधाव बसच्या गिअरबॉक्समध्ये बिघाड निर्माण झाल्याने झालेल्या अपघातात ३५ प्रवाशी जखमी झाल्याची घटना आज दुपारी ४.३० वाजता दरम्यान अर्जुना घाट परिसरात घडली. यात रुद्रेश प्रवीण शिंदे, ज्योती प्रवीण शिंदे रा. आर्णी, लक्ष्मण तानबा गोल्हर, तुकाराम सोमला जाधव, शशिकला गोल्हर, जान्हवी गोल्हर, मंदा राजू गायधने रा. लोणी, अंबादास तळपदे, मंगेश डवले रा. पहापळ, प्रमोद खत्रे, वंदना खरतडे रा. आष्टी, लता तिडके रा. मांगलादेवी यांच्यासह अन्य प्रवाशी जखमी झाले.
मोर्शी-माहूर बस क्रमांक एम.एच. ४०/ एन ८९६७ आर्णीकडे जात होती. दरम्यान अर्जुनाघाट परिसरात बसच्या गिअरबॉक्समध्ये बिघाड झाला. यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ही बस दहा फूट खड्यात कोसळली. यामुळे बसमधील ३५ प्रवाशी जखमी झाले. जखमींना तत्काळ उपचारासाठी कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चालकाविरुद्घ गुन्हा नोंद करण्यात आला आहे.









