
शिमला – हिमाचल प्रदेशातील किन्नूर जिल्ह्यात गुरुवारी खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात २३जण ठार झाले तर २० जण जखमी झाले.
३५ प्रवाशांना घेऊन ही बस हिमाचल प्रदेशातील कल्पाच्या दिशेने निघाली होती. यावेळी रोहतृंग गावातील ४०० फूट खोल दरीत ही बस कोसळली. या अपघातात १६ जण जागच्या जागी ठार झाले तर इतर सात जणांचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये बसचालक आणि वाहकाचाही समावेश आहे.
या अपघातात जखमी झालेल्या २० जणांना तेथील जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती किन्नूर उपायुक्त डी.डी. शर्मा यांनी दिली. बसमधील प्रवासी हे जवळील सांग्ला गावातील रहिवासी होते. मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून जिल्हा प्रशासनाला जखमींना संपूर्णपणे मदत आणि आवश्यक त्या आरोग्यसुविधा पुरविण्याचे आदेश दिले आहेत.









