बहिष्कार, काळ्या झेंड्यांनी गाजला मोदींचा विदर्भ दौरा

ModiNag
नागपूर – मेट्रोच्या भूमिपूजनासाठी विदर्भात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर राज्यातल्या आघाडी सरकारने बहिष्कार घातल्याचे आज दिसून आले. मौदा येथे एनटीपीसीच्या वीजनिर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण आणि नागपूर मेट्रोच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अथवा आघाडी सरकारमधील एकही मंत्री दिसला नाही. नागपूर शहरात मोदी यांना काळे झेंडे दाखविण्यात आले होते. या निदर्शकांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूर आणि परिसरात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. एनटीपीसीच्या पाचशे मेगावॉटच्या दुसऱ्या युनिटचे लोकार्पण, नागपूर मेट्रोचे भूमिपूजन, पारडी येथे ४६९ कोटी रुपयांचा अंडरब्रिजच्या बांधकामाचा समावेश होता. मात्र या कार्यक्रमांना उपस्थित न राहण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी काल, बुधवारी जाहीर केला होता. सोलापूर येथे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जुगलबंदी रंगली होती. शिवाय हरियाणामध्ये पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री हुड्डा यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या. या घटनांच्या पार्श्वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता.
मोदींना काळे झेंडे दाखविले कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना अपमानाची वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप करत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नागपुरात दोन ठिकाणी मोदींविरोधात निदर्शने केली. कस्तुरचंद पार्कमध्ये मोदींचा कार्यक्रम सुरु असताना जवळच रिझर्व बँक चौकात कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी काही कार्यकर्त्यांसोबत मोदींविरोधात घोषणा देत काळे झेंडे दाखविले.
त्या आधी विमानतळावरून कार्यक्रमाच्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा चालला असताना माजी मंत्री अनिस अहमद यांनी काळे झेंडे दाखविले होते. नंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


9 + six =