अॅडलेड- इंग्लंडवर १५ धावांनी विजय मिळवत बांगलादेशने विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. बांगलादेशने अंतिम आठ संघांत स्थान पटकावले तरी गटवार साखळीच्या (अ गट) पाच लढतींमधील चौथ्या विजयाने इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आले. मोहम्मद महमुदुल्लाहसह (१०३) मध्यमगती रुबेल होसेनने (४ विकेट) विजयात मोलाचा वाटा उचलला. २९ वर्षीय महमुदुल्ला हा विश्वचषक स्पर्धेत शतक ठोकणारा बांगलादेशचा पहिला क्रिकेटपटू ठरला. योगायोग म्हणजे त्याचे वनडेतीलही हे पहिलेच शतक आहे.
ही लढत इंग्लंडसाठी ‘करा किंवा मरा’ अशी होती. गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली तरी फलंदाजांनी निराशा केल्याने बांगलादेशचे २७६ धावांचे आव्हान गाठताना इंग्लंडचा डाव ४८.३ षटकांत २६० धावांत आटोपला. सलामीवीर इयन बेल (६३), मधल्या फळीतील जोस बटलर (६५) आणि ख्रिस वोक्सने (नाबाद ४२) मैदानावर तग धरताना विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले तरी रुबेल होसेनसह कर्णधार मश्रफे मोर्ताझा आणि तस्कीन अहमदच्या (प्रत्येकी २ विकेट) प्रभावी मा-यामुळे रंगतदार लढतीत बांगलादेशने बाजी मारली.
इयन बेलने एक बाजू लावून धरली तरी अन्य सहका-यांना मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने ३०व्या षटकांत ५ बाद १३२ धावा अशी इंग्लंडची अवस्था होती. सामना एकतर्फी होणार, असे वाटत असतानाच बटलर आणि वोक्सने सातव्या विकेटसाठी १०.१ षटकांत ७५ धावा जोडताना लढतीत रंगत आणली. मात्र बटलरची विकेट पडल्यानंतर इंग्लंडच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आल्या. वोक्सने विकेट राखली तरी तळातील ख्रिस ब्रॉड आणि जेम्स अँडरसनला एकाच षटकात बाद करताना रुबेल होसेनने बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गेल्या खेपेसही गटवार साखळीत इंग्लंडला बांगलादेशने हरवले होते. शतकवीर महमुदुल्ला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
तत्पूर्वी, महमुदुल्ला (१३८ चेंडूंत १०३ धावा) आणि मुशफिकुर रहिमने (७७ चेंडूंत ८९ धावा) पाचव्या विकेटसाठी रचलेली १४१ धावांची विक्रमी भागीदारी बांगलादेशच्या डावाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा इंग्लंडचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. अनुभवी जेम्स अँडरसनसह ख्रिस जॉर्डन (प्रत्येकी २ विकेट) तसेच स्टुअर्ट ब्रॉड आणि मोईन अलीने (प्रत्येकी एक विकेट) ठराविक अंतराने विकेट घेतल्या तरी महमुदुल्ला आणि मुशफिकुर जोडीने जवळपास निम्मी षटके (२३.५) खेळून काढताना बांगलादेशला पावणेतीनशे धावांची मजल गाठून दिली. मात्र त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. अँडरसनने लागोपाठच्या षटकांत तमिम इक्बाल आणि इम्रुल कायेसला (प्रत्येकी २ धावा) झटपट माघारी धाडले. २ बाद ८ अशा अवस्थेतील बांगलादेशच्या मदतीला महमुदुल्ला धावला. त्याने सौम्य सरकारसह (४०) तिस-या विकेटसाठी ८६ धावा जोडल्या. त्यानंतर महमुदुल्ला आणि मुशफिकुरची पाचव्या विकेटसाठीची १४१ धावांची भागीदारी विक्रमी ठरली. विश्वचषकात बांगलादेशतर्फे कुठल्याही विकेटसाठीची ती सर्वाधिक भागीदारी आहे. महमुदुल्लाला विश्वचषकातील पहिले शतक ठोकण्याची संधी स्कॉटलंडविरुद्ध होती. मात्र त्यावेळी ९५ धावांवर तो बाद झाला. फलंदाजीत सातत्य राखताना इंग्लंडविरुद्ध महमुदुल्लाने स्वत:च्या नावे एक विक्रम केलाच. १३८ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांसह महमुदुल्लाने पहिले शतक साजरे केले.










