
ढाका- बांगलादेशमधील पद्मा नदीत २५० जणांना घेऊन जाणारी बोट सोमवारी बुडाली. या दुर्घटनेत २०० हून अधिक जण बेपत्ता झाले आहेत. नदीतील भोवरे आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्याने ही बोट बुडाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना मुंशीगंज भागात घडली.
या दुर्घटनेतून ४५ प्रवाशांना वाचवण्यात यश मिळाले असून दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. प्रवाशांना वाचवण्यासाठी तातडीने वेगवान बोटी घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशांना वाचवण्यासाठी नौदल व अग्निशमन दलाच्या पाणबुडयांची मदत घेण्यात येत असल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले. काही प्रवाशांनी स्वत: पोहून किनारा गाठला. मात्र अनेकजण बुडाले किंवा वाहून गेले असावेत, असे मुंशीगंजचे पोलिस प्रमुख तोफझ्झल हुसैन यांनी सांगितले. बोटींचे चुकीचे डिझाइन आणि सुरक्षेविषयक दर्जाशी तडजोड केल्याने बांगलादेशात बोटी बुडण्याचे प्रकार वाढत आहेत.









