
ठाणे – कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या एका कुख्यात डान्स बारवर १२ मार्च रोजी धाड पडली तेव्हा या बारमध्ये चक्क दोन पोलीस तेथील बार बालांबरोबर अश्लील चाळे करताना आढळून आले.
या अश्लील चाळयांची व्हिडीओ क्लिप ठाण्यापर्यंत पोहोचली आणि गुरुवारी सकाळ पोलीस दलात एकच खळबळ उडाली. या क्लिपमध्ये बारबालांशी अश्लील चाळे करताना आढळून आलेल्या त्या दोन्ही पोलिसांवर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी निलंबनाची कारवाई केल्याने मानपाडा पोलीस अडचणीत सापडले आहेत. कल्याण-शिळ रोडला सोनारपाडा गावाजवळ इंद्रप्रस्थ नामक लेडीज सर्व्हीसच्या नावाखाली पहाटे उशिरापर्यंत चालणारा बार आहे. या बारमध्ये कानठळया बसविणाऱ्या डीजेच्या आवाजावर अर्धनग्नावस्थेत थिरकणाऱ्या बारबालामुळे सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त कालिदास सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मानपाडा पोलिसांनी या बारवर रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक धाड टाकली. या वेळी अश्लील गाण्यांच्या तालावर सर्व बारबाला बीभत्स हाव-भाव करत बारमधील उपस्थित ग्राहकांच्या भावना भडकावताना आढळून आल्या. तत्पूर्वी कुणीतरी याच बारमध्ये व्हिडीओ शूटींग करुन ते पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचविले होते. धाडीच्या वेळी पोलिसांनी सुधाकर मनगोर (वय ३२), रजत शेट्टी (३०), संतोष अंधारीकर (३६), रवि दुबे (२४), सुरेंद्र शेट्टी (३४), उमेश शेट्टी (५७) आणि प्रदीप काळे (२४) या बार चालक, कॅशियर, म्युझिक ऑपरेटर्ससह १७ बारबालांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या बारमधून डिजेसह इतर सामान ताब्यात घेतले आहे. मात्र या बारमध्ये मानपाडा पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँचचे संजय बाबर आणि रशीद मुलानी हे दोघे बारमधील बारबालांशी अश्लील चाळे करतानाचे व्हिडीओ क्लिपमध्ये चौकशी दरम्यान आढळून आले. या क्लिपची पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी चार दिवसांनंतर गंभीर दखल घेतली. गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्तांनी काढलेल्या फतव्यामुळे ठाणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. या दोन्ही वादग्रस्त पोलिसांना निलंबित करण्यात आले असून, या कारवाईमुळे मानपाडा पोलीस अडचणीत सापडले आहेत.









