नवी दिल्ली- आम आदमी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी अरविंद केजरीवाल सरकारचा पाठींबा काढून घेत असल्याचे मंगळवारी जाहीर केले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे भ्रष्ट व्यक्तीपेक्षा धोकादायक असल्याचा आरोप बिन्नी यांनी यावेळी केला.
दिल्लीतील ‘आप’ सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पक्ष नायब राज्यपाल नजीब जंग यांना लिहणार असल्याचे बिन्नी यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून केजरीवाल यांच्यावर टीका करणा-या बिन्नी यांनी बुधवारी पुन्हा एकदा त्याच्यावर तोफ डागली. केजरीवाल केवळ दिल्लीतील नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेशी खोटे बोलत आहेत.
सरकारचा पाठिंबा काढून घेतला असलातरी जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे बिन्नी यांनी सांगितले. जर अण्णा हजारे यांना अपेक्षीत असलेले जनलोकपाल विधेयक सरकारने सादर केले तर आपण त्याला पाठींबा देऊ असे ते म्हणाले.दिल्ली सरकारने ४८ तासात स्वस्त वीज आणि पाणी, महिलांची सुरक्षा आणि राष्ट्रकुल घोटाळ्याच्या चौकशीकरावी अन्यथा पाठिंबा काढून घेऊ असा इशारा बिन्नी यांनी रविवारी दिला होता.









