बिबट्याचा हल्ला, बालक ठार

1
पुणे – जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावात रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आणखी एका बालकाचा मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी झोपी गेलेल्या प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरीता सोमवारी सकाळी नगर-कल्याण महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
वन विभागाच्या नाकर्तेपणामुळे या भागात गेल्या महिना-दोन महिन्याच्या कालावधीत बिबट्याने हल्ला केल्याच्या सहा घटना घडल्या आहेत. याकडे वन विभागाचे अधिकारी सोईस्कररित्या कानाडोळा करत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरीता सोमवारी सकाळी जुन्नर तालुक्यातील ओतूर, डिंगोरे, खामुंडी गावच्या ग्रामस्थांनी नगर-कल्याण रास्ता रोखून धरला. यामुळे सोमवारी नगर-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन माघारी घेण्याकरीता ओतूर पोलिसांनी मध्यस्थी केली. मात्र, ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अगोदर बोलवा, मगं काय ते बघू अशी भूमिका घेतल्याने पोलिसांची चांगलीच गोची झाली. अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चेचे आमंत्रण दिल्यानंतरच ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसामधील ही तिसरी घटना आहे. त्यात २ बालकांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे जुन्नर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साई संतोष मंडलिक असे मृत्युमुखी पडलेल्या अडीच वर्षीय बालकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी मंडलिक कुटुंब अंगणात बसले होते. अचानक आलेल्या बिबट्याने सर्वांसमोर साईला ओढून नेले. सगळ्यांनी आरडाओरड केली. मात्र बिबट्याने बालकाला सोडले नाही, असे नातेवाईकांनी सांगितले. मागील महिन्यात जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर तीन वर्षीय बालिका गंभीर जखमी झाली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× five = 5