
यवतमाळ – जंगलात पाणी मिळत नसल्याने वन्यप्राणी आता गावाकडे धाव घेत आहे. पाण्याच्या शोधात निघालेल्या बिबट्याने गावानजीकच्या शेतात बांधलेल्या म्हशीचा फडशा पाडला. ही घटना काल मध्यरात्री दरम्यान तालुक्यातील कापरा (हेटी)येथे घडली.
यवतमाळपासून ११ किलोमिटर अंतरावर किटाकापरा जंगल असून जवळच कापरा (हेटी)नावाचे छोटेशे गाव आहे. गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने बहुतांशजणाकडे जनावरे आहे. संतोष वसंतराव झामरे या शेतकºयाने आपली जनावरे गावालगतच्या शेतात बांधली होती. काल रात्री विजांच्या कडकडाट व वारा असल्याने शेतात कुणीही गेले नव्हते. मात्र मध्यरात्री म्हशींचा ओरडण्याचा आवाज आल्याने गावकºयांनी शेताकडे धाव घेतली. त्यांचा आवाज ऐकूण म्हशीला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. जंगल परिसरात आतापर्यंत अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. मात्र आता थेट गावातच बिबट्याने शिरकाव केल्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे. मागीलवर्षीही बिबट्याने धनगराच्या जनावराचा फडशा पाडल्याची माहिती आहे.









