
बीड- थकित वेतनासाठी धरणे आंदोलन करणा-या हिरामन साहेबराव भंडाने (३२) या शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
संतापलेल्या आंदोलनकर्त्या शिक्षकांनी भंडाने यांचा मृतदेह जिल्हा परिषदेच्या दारात एक तास ठेवला होता. यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन शिक्षण विभागाची तत्काळ बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर भंडाने यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.
हिरामन भंडाने हे चौसाळा केंद्रातील कोकणे वस्ती शाळेवर कार्यरत होते. शिक्षण विभागात मंजूर पदांपेक्षा शिक्षकांची संख्या अधिक झाल्याने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना ११ महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. यात हिरामण यांचाही समावेश आहे. प्रश्न न सुटल्याने या शिक्षकांनी १६ मार्चपासुन बीडमध्ये जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरु केले. याआंदोलनादरम्यान, गुरुवारी हिरामन भंडाने यांना पोटदुखीचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी पहाटे त्यांनी गळफास लावुन आत्महत्या केली.
शिक्षक म्हणून नोकरी मिळाल्यानंतर मागिल ११ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने ते मोठ्या आर्थिक विवंचनेत होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असून या प्रकरणी दोषी असलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय बहुजन कर्मचारी कल्याण महासंघाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.









