-
यवतमाळ, दि. ९ – बोहल्यावर चढण्यासाठी दोन दिवस शिल्लक असतानाच भूमिपुत्र असलेल्या नवरदेवाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आर्णी तालुक्यातील मुकिंदपूर येथे घडली. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांवर अंत्ययात्रेसाठी जाण्याची वेळ आली असून या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रशांत जनार्धन इंगोले रा. मुकिंदपूर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या आईच्या नावाने ११ एकर शेती असून दोन वर्षापासून वडीलही आजारी आहे. त्यामुळे प्रशांत हा शेती करीत होता. यावर्षी निसर्गाच्या लहरिपणामुळे पिकाची नासाडी झाल्याने उत्पन्न कमी झाले होते. प्रशांतची उमरखेड तालुक्यातील कळमुला येथील युवतीसोबत साक्षगंधाही काही महिन्यापूर्वी पार पडले होते. ११ मार्च रोजी त्याचा विवाह होणार होता. दोन्ही बाजूने लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. दोन दिवसावर लग्न असल्याने बहिणी, जावाई याच्यासह अन्य नातेवाईकही त्याच्याकडे आले होते. अशातच ८ मार्च रोजी रात्री बहिणी व मुलींनी प्रशांतच्या हातावर मेहंदी काढून दिली होती. यावेळी आपल्याकडे सोसायटीचे १ लाख ५० हजार रुपये कर्ज, ट्रॅक्टरचे चार लाख आणि लग्नासाठी घेतलेले कर्ज असल्याचे बहिणींना सांगितले. सदर कर्ज कसे फेडावे या बाबतच चिंता वाटत असल्याचेही त्याने बोलुन दाखविले. अशातच आज सकाळी प्रशांतने गावालगत शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली. सकाळी बराच वेळ होऊनही तो घरी न दिसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली मात्र थागपत्ता लागला नाही. अशातच प्रशांतचा गावालगत शेतात मृतदेह आढळून आल्याने शोककळा पसरली. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांवर अत्यसंस्काराला जाण्याची वेळ आली.










