भारताचा अफगाणिस्तानवर आठ गडी राखून विजय

Shikhar Dhawan

मिरपूर- आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने अफगाणिस्तानवर आठ गडी राखून दमदार विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने ठेवलेले १६० धावांचे आव्हान भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात ३२.२ षटकात पूर्ण केले.

भारताकडून पहिल्या विकेटसाठी शिखर धवन आणि अंजिक्य रहाणेने सर्वाधिक १२१ धावांची भागीदारी केली. १२१ धावा झाल्यानंतर भारताच्या पहिल्या खेळाडूला बाद करण्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना यश आले. अजिंक्य रहाणे मिरवासच्या गोलंदाजीवर ५६ धावा करुन बाद झाला. त्यानंतर लगेचच शिखर धवन ६० धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या रोहित शर्मा (१८) आणि दिनेश कार्तिक (२१) यांनी अफगाणिस्तानचे १६० धावांचे तुटपुंजे आव्हान ३२ षटकातच पूर्ण केले. अफगाणिस्तानच्या मिरवास आणि मोहम्मद नाबी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात थोडी अ़डखळतच झाली. भारतीय गोलंदाजांपुढे अफगाणिस्तानच्या फलंदाजांची पुरती भंबेरी उडाली. ३० धावा झाल्या तेव्हा त्यांचा पहिला फलंदाज तंबूत परतला. त्यानंतर टप्पाटप्प्याने अफगाणिस्तानचे फलंदाज बाद होत गेले. शेनवरी(५०), नूर अली(३१) ,शहाजहाद(२२) आणि दवलत(१४) यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही करता आली नाही. मंगल आणि नूर अली या जोडीला पहिल्या विकेटसाठी सर्वीधिक ३० धावांची भागीदारी करता आली.  भारताकडून रविद्र जडेजाने सर्वाधिक चार बळी घेतले. तर आर. अश्विन(३), शामी(२) आणि मिश्रा(१) गडी बाद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ nine = 13