भारताचा झिम्बाब्वेवर चार धावांनी विजय

AP7_10_2015_000199A

हरारे – शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत शुक्रवारी झिम्बाब्वेवर ४ धावांनी मात करताना भारताने तीन लढतींच्या मालिकेत विजयी सलामी दिली. मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील पाहुण्यांचा हा पहिलाच विजय आहे. अंबाती रायुडूने दमदार शतकासह स्टुअर्ट बिन्नीसोबत केलेली १६० धावांची भागीदारी भारताच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले.
भारताच्या २५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला ७ बाद २५१ धावा करता आल्या. कर्णधार इल्टन चिगुंबुराच्या (१०४) नाबाद शतकामुळे यजमानांनी चुरस दिली. त्याला सिकंदर रझा (३७) आणि हॅमिल्टन मॅसॅकद्झाची (३४) चांगली साथ लाभली. या त्रिकुटाच्या चांगल्या फलंदाजीनंतरही भारताने पारडे जड वाटत होते.
मात्र कर्णधार चिगुंबुराने विकेट कायम ठेवल्याने यजमानांची धुगधुगी कायम होती. १८ चेंडूंत जिंकण्यासाठी ३२ धावा हव्या असताना चिगुंबुरा-क्रीमरने भुवनेश्वर कुमारच्या आठव्या आणि डावातील ४४व्या षटकात १४ धावा वसूल केल्याने भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले. धवल कुलकर्णीने त्याच्या षटकात ८ धावा दिल्याने शेवटच्या षटकात सामना गेला. ६ चेंडूंत १० धावांची असताना भुवनेश्वरने मागील चुका टाळताना फक्त ५ धावा देत भारताला ४ धावांनी जिंकून दिले.
तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २५५ धावांची मजल मारली. त्याचे श्रेय अंबाती रायुडूसह अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीला जाते. रायुडूने ४६.४ षटके मैदानावर टिकून राहताना नाबाद १२४ धावांची जबाबदार खेळी केली.
१३३ चेंडूंमधील त्याच्या दुस-या शतकात १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. रायुडूला बिन्नीची सुरेख साथ लाभली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी करताना भारताला अडीचशेपार पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. बिन्नीने ७६ चेंडूंत ६ चौकार आणि दोन षटकारांसह ७७ धावांची उपयुक्त खेळी केली. त्याची कारकीर्दीतील ही सर्वाधिक खेळी आहे.
२५ षटकांत निम्मा संघ ८९ धावांत परतल्यानंतर भारत प्रतिस्पर्ध्यासमोर अडीचशेहून अधिक धावा करेल, असे वाटले नव्हते. मात्र रायुडू आणि बिन्नीमुळे पुढील २५ षटकांत १६६ धावा निघाल्या. या जोडीने २४.३ षटके खेळून काढताना विक्रमी १६० धावा जोडल्या.
भारतातर्फे झिम्बाब्वेत झालेली सहाव्या विकेटसाठीची ही सर्वाधिक भागीदारी आहे. पाहुण्या फलंदाजांनी शेवटच्या १० षटकांत ९० धावा झोडपून काढल्या. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा झिम्बाब्वेचा कर्णधार इल्टन चिगुंबुराचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. तिस-याच षटकात मध्यमगती ब्रायन व्हिटोरीने सलामीवीर मुरली विजयला (१) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
कर्णधार अजिंक्य रहाणेने (३४) ‘वनडाऊन’ रायुडूसह दुस-या विकेटसाठी ५१ धावा जोडताना भारताला सावरले तरी अजिंक्यनंतर मनोज तिवारी (२), रॉबिन उथप्पा (०) आणि केदार जाधवमध्ये (५) बाद होण्याची स्पर्धा लागल्याने ५ बाद ८७ धावा अशी भारताची दयनीय अवस्था झाली.
हरारे स्पोर्ट्स क्लबच्या खेळपट्टीवरील दवाचा फायदा यजमानांच्या गोलंदाजांनी उठवला. त्यात आघाडीच्या फलंदाजांच्या चुकांची भर पडली. मात्र झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना दुस-या टप्प्यात दिशा आणि टप्पा राखता आला नाही. यजमानांतर्फे चामू चिभाभा आणि डोनाल्ड टिरिपॅनो (प्रत्येकी २ विकेट) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले.
संक्षिप्त धावफलक : भारत – ६ बाद २५५(रायूडू नाबाद १२४, बिन्नी ७७, चिभाभा २५-२) वि. झिम्बाब्वे – ७ बाद २५१(चिगुंबुरा नाबाद १०४, पटेल ४१-२, बिन्नी ५४-२). निकाल : भारत ४ धावांनी विजयी. तीन लढतींच्या मालिकेत १-० आघाडी. सामनावीर : अंबाती रायुडू.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


9 + six =