
सिडनी- विश्वचषकातील अत्यंत महत्त्वाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक मा-यासमोर भारताच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याने भारताचा दारुण पराभव झाला. यासोबतच भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले.
विश्वचषकातील पहिल्या सामन्यापासून भारताने विजयी मालिका कायम ठेवली होती. मात्र उपांत्यफेरीच्या सामन्यात ही मालिका अखेर खंडित झाली. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने भारताला नमवत सातव्यांदा अंतिम फेरी गाठली.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३२९ धावांचे मोठे आव्हान गाठताना भारताला ४६.५ षटकात केवळ २३३ धावा करता आल्या. भारतीय फलंदाजांची पडझड सुरु असताना एका बाजूने मैदानात किल्ला लढवत महेंद्रसिंग धोनीने भारताच्या विजयाच्या आशा थोड्या पल्लवित केल्या होत्या. मात्र तो बाद झाला आणि विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या. धोनीने ६५ चेंडूत ६५ धावा केल्या.
यापूर्वीच्या सात सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करणारे भारताचे फलंदाज आणि गोलंदाज ऑस्ट्रेलिया संघापुढे निष्प्रभ ठरले. सात सामन्यांमध्ये ७० बळी घेणा-या भारतीय गोलंदाजाची कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मात्र चांगली झाली नाही. वेगवान मारा कऱणा-या मोहम्मद शामीला या सामन्यात एकही गडी बाद करता आला नाही. उमेश यादवने चार गडी बाद केल्याने ऑस्ट्रेलियाला ३२८ धावांवर रोखण्यात भारताला यश मिळाले होते.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करणाचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्ही़ड वॉर्नरला (१२) बाद करुन भारताला पहिले यश झटपट मिळाले. सलामीवीर डेव्हीड वॉर्नर (१२) धावांवर बाद झाला. उमेश यादवने त्याला कोहलीकरवी झेलबाद केले. मात्र स्मिथ आणि फिंचने दुस-या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक १८२ धावांची भागीदारी केली.
शानदार शतक साकारुन ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार देणारा स्टीवन स्मिथ (१०५) धावांवर बाद झाला. स्मिथने ९३ चेंडूत (१०५) धावा केल्या. स्मिथच्या शतकी खेळीत अकरा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. उमेश यादवने स्मिथला रोहित शर्माकरवी झेलबाद केले.
स्मिथ बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या मॅक्सवेल आणि फिंचने तिस-या विकेटसाठी झटपट ३५ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेल धोकादायक ठरणार असे वाटत असतानाच अश्विनने त्याला (२३) धावांवर रहाणेकरवी झेलबाद केले. त्यानंतर खेळपट्टीवर जम बसवलेल्या फिंचला (८१) धावांवर उमेश यादवने शिखर धवनकरवी झेलबाद झाला.
स्टीवन स्मिथ बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज झटपट बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव अडचणीत सापडला होता. मॅक्सवेल आणि अॅरॉन फिंच पाठोपाठ ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कही (१०) धावांवर बाद झाला. त्याला मोहितने रोहित शर्माकरवी झेलबाद केले. मात्र फॉकनर (२१) आणि वॉटसनने (२८) फटकेबाजी करत धावगती कायम ठेवली. याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ३२९ धावांचे अवघड लक्ष्य दिले होते.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३२९ धावांच्या अवघड लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र हेझलवूडच्या गोलंदाजीवर शिखर धवन ४५ धावांवर बाद झाला. पाठोपाठ विराट कोहली अवघी एक धाव काढून तंबूत परतला. जॉन्सनच्या उसळत्या चेंडूवर हूक मारण्याचा मोह कोहलीला आवरता आला नाही. तर हेझलवूडच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात शिखर धवनने (४५) मॅक्सवेलकडे झेल दिला.
अजिंक्य रहाणेने कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या साथीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण अजिंक्य रहाणे ४४ धावा करुन तंबूत परतला. त्याने पाचव्या विकेटसाठी कर्णधार धोनीसह ७० धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेला रविंद्र जाडेजाही अवघ्या १६ धावा करुन धावबाद झाला.
त्यानंतर सुरेश रैना (७) फॉकनरच्या चेंडूवर हॅडिनकडे झेल देत बाद झाला. भारतीय फलंदाजांची पडझड सुरु असताना एका बाजूने मैदानात भक्कम पाय रोवून उभा असलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनी (६५) धावबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने विजयाचा अर्धा गड जिंकला.
आर अश्विन पाच धावांवर त्रिफळाचीत बाद झाला. तर मोहित शर्मा आणि उमेश यादव भोपळा न फोडताच माघारी परतल्याने भारताचा डाव ४६.५ षटकात २३३ धावांमध्ये आटोपला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया- सात बाद ३२८
भारत- ४६.५ षटक सर्वबाद २३३
सामनावीर- स्टीव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया)









