
हॅमिल्टन -सलामीवीर शिखर धवनने साकारलेल्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने आर्यंलडवर आठ विकेट राखून मात करत विश्वचषकातील सलग पाचव्या विजयाची नोंद केली.
‘जायंट किलर’ अशी ओळख असलेल्या आर्यंलडचे २६० धावांचे आव्हान भारताने आठ विकेट आणि ७९ चेंडू राखून पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करणा-या आर्यंलडने सर्व बाद २५९ धावा केल्या होत्या. भारताने हे आव्हान सहज पूर्ण केले आणि विजयी अभियान कायम ठेवले.
सलामीवीर शिखर धवनने साकारलेले शतक, रोहित शर्माची अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताला हे आव्हान लीलया पेलता आले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १७४ धावांची भागीदारी रचत भक्कम पाया रचला. त्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या जोडीने ७० धावांची भागीदारी करत विजयाचा कळस चढविला.
फलंदाजीस अनुकूल असलेल्या हॅमिल्टनच्या खेळपट्टीवर आर्यंलडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवात दमदार झाली. सलामीवीर कर्णधार पोर्टरफिल्ड(६७) आणि पॉल स्टर्लिंगने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. आयर्लंडने दोनशे धावांची वेस ओलांडली तेव्हा त्यांचे फक्त तीन गडी बाद झाले होते. कर्णधार पोर्टरफिल्ड अर्धशतक झळकवून (६७) धावांवर बाद झाला. मोहित शर्माने त्याला उमेश यादवकरवी झेलबाद केले.
स्टर्लिंगला अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळयात अडकवत (४२) धावांवर अजिंक्य रहाणेकडे झेल द्यायला भाग पाडले. जॉईसला अवघ्या (२) धावांवर रैनाने तंबूची वाट दाखवली. त्यानंतर बालर्बिनी आणि नियाल ओब्रायनची जोडी मैदानावर होती. हे दोघे फलंदाजी करत असताना आयर्लंड मोठी धावसंख्या उभारेल असे चित्र होते. मात्र अश्विनने बालर्बिनीला बाद करुन ही जोडी फोडली आणि आयर्लंडचा डाव गडगडला. आयर्लंडचे शेवटचे सात फलंदाज ५९ धावांत तंबूत परतले. बालर्बिनी बाद झाल्यानंतर दोन धावांच्या फरकाने दमदार फलंदाजी करणारा नियाल ओब्रायन तंबूत परतला. त्याला मोहोम्मद शामीने उमेश यादवकरवी झेलबाद केले. त्यानंतर आयर्लंडचा डाव शेवटपर्यंत सावरला नाही.
आर्यंलडने विजयासाठी ठेवलेले हे २६० धावांचे आव्हान घेऊन सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. या दोघांनी आयरिश गोलंदाजांची गोलंदाजी निष्प्रभ ठरवत दिमाखदार १७४ धावांची भागीदारी साकारली. धवनने विश्वचषकातील दुसरे आणि एकदिवसीय क्रिकेटमधील आठवे शतक साकारले तर रोहितने अर्धशतकी खेळी केली. धवनने ८५ चेंडूत १०० धावा केल्या. तर रोहितने ६६ चेंडूत ६४ धावा केल्या. शंभरहून अधिक धावांची भागीदारी करणारी रोहित -धवनची या भारतीय सलामीवीरांची ही पाचवी जोडी ठरली. रोहित आणि धवन बाद झाल्यानंतर विराट आणि अजिंक्यने मिळून ७० धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.









