
अॅडलेड- विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ७६ धावांनी सहज विजय मिळवला. सलग सहाव्यांदा भारताने पाकिस्तानला विश्वचषकात धूळ चारली. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत झालेल्या पाच लढतीत भारताने बाजी मारली होती. धोनी ब्रिगेडने विश्वचषकातील हा इतिहास कायम राखला.
गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाच्या कामगिरीबाबत सर्वच स्तरातून चिंता व्यक्त केली जात होती. फलंदाजी ही भारताची जमेची बाजू. मात्र त्यातही गेल्या काही सामन्यांमध्ये सातत्य दिसून येत नव्हते. अशा परिस्थितीत पाकिस्तानला हरवणे तितकेसे सोपे नव्हते. मात्र धोनी आणि सहका-यांनी ही किमया साधली.
शतकवीर विराट कोहली, शिखर धवन आणि सुरेश रैना या त्रिकुटाने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत भारताला तीनशे धावांचा टप्पा गाठून दिला. विराट कोहलीचे शतक सामन्यातील मोठे वैशिष्ट्य ठरले. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा विराट हा पहिला भारतीय फलंदाज ठरला. यासोबतच त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील २२ वे शतक पूर्ण केले. त्याने १२६ चेंडूत आठ चौकांराच्या मदतीने १०५ धावा केल्या. त्याला उत्तम साथ लाभली ती शिखर धवन आणि सुरेश रैनाची. त्यांच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर ३०१ धावांचे आव्हान ठेवले. मात्र पाकिस्तानला हे आव्हान पेलवले नाही आणि त्यांचा डाव २२४ धावांत संपुष्टात आला. पाकिस्तानचा कर्णधार मिसबा उल-हकने ७६ धावा करत पाकिस्तानला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे हे प्रयत्न अपुरे पडले आणि पाकिस्तानचा ७६ धावांनी पराभव झाला. मोहोम्मद शामीने पाकिस्तानच्या चार फलंदाजांना तंबूत धाडत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतीय फलंदाजांनी तो निर्णय सार्थ ठरविला. सराव सामन्यात बांगलादेशविरुद्ध सरस कामगिरी करणारा रोहित शर्मा या सामन्यात चमक दाखवू शकला नाही. तो १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट आणि धवनने खेळपट्टीवर जम बसवत धावांची टांकसाळ उघडली. शिखरने सलामीला फलंदाजी करत ७३ धावांची खेळी केली. त्याने विराटसह १२९ धावांची भागीदारी केली. शिखर बाद झाल्यानंतर विराटने रैनासोबत तिस-या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी साकारली. ४५ व्या षटकात विराट बाद झाला. त्यानंतर लगेचच रैनाही बाद झाला. हे दोघेही बाद झाल्यानंतर भारताचा डाव एकदम कोसळला. अखेरच्या पाच षटकात भारताने केवळ २७ धावा करत पाच गडी गमावले. पाकिस्तानच्या सोहेलने ५५ धावांत सर्वाधिक पाच बळी घेतले.









