
नवी दिल्ली- भारत-अमेरिका परस्पर सहकार्य कायम ठेवणार असून भारत-अमेरिका मैत्री ही जगाच्या हिताची आहे. भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर नेऊ, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबामा यांनी हैदराबाद हाऊस येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजमेर, विशाखापट्टणम व अलाहाबाद या तीन शहरांचा विकास आम्ही करू. ही तिन्ही शहरे स्मार्ट बनवू, असे आश्वासन ओबामा यांनी दिले आहे. मोदींचे मॅडिसन स्क्वेअर येथे बॉलिवूड स्टारप्रमाणे स्वागत करण्यात आल्याची आठवणही त्यांनी सांगितली. त्याबद्दल त्यांनी मोदींचे कौतुक केले.
ओबामा यांनी हिंदीतून ‘नमस्ते‘ असे म्हणत आपल्या संवादाला सुरुवात केली. ‘भारतवासीयों को मेरा प्यार भरा नमस्कार‘ असेही हिंदीतून बोलत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी दहशतवादाविरोधात लढण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झाल्याचे मोदी यांनी सांगितले. या शतकाच्या वाटचालीला एका व्यक्तिमत्वाप्रमाणे आकार देण्यासाठी भारत-अमेरिका संबंध महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
भारत-अमेरिका अणुकरारातील दोन महत्त्वाचे अडसर दूर
भारत आणि अमेरिका यांच्यामधील महत्त्वाकांक्षी अणुकरारातील दोन मुद्द्यांवर सहमती झाल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले. तसेच अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात सहकार्य करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यासोबतच दहशतवादाशी दोन हात करताना कोणतीही तडजोड होणार नाही, असेही बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी म्हणाले. भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी आम्ही पाठिंबा देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले.
संयुक्त पत्रकार परिषदेत संबोधन करण्याआधी दुपारी मोदी आणि ओबामा यांच्यात २० मिनिटे चर्चा झाली. यावेळी मोदींनी स्वत: ओबामांसाठी चहा तयार केला. त्यानंतर ‘थँक्यू फॉर द चाय पे चर्चा’ असा उल्लेख ओबामा यांनी आपल्या संबोधनात केला.
ओबामांचे आभार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे तीन दिवसाच्या भारत दौ-यावर असून रविवारी दुपारी हैद्राबाद हाऊसमध्ये ओबामा आणि मोदी यांच्यात सुमारे दीड ते दोन तास चर्चा झाली. या चर्चेनंतर ओबामा आणि मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मोदींनी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून भारत दौ-यावर आल्याबद्दल ओबामांचे आभार मानले. दोन्ही देशांमधील नैसर्गिक संबंध असून संरक्षण, उत्पादन या क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील असे मोदींनी सांगितले. दहशतवादाविरोधात लढण्यात दोन्ही देशांमध्ये एकमत असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला. तर ओबामा यांनीही भारतीयांच्या आदरातिथ्यामुळे भारावून गेल्याचे सांगितले.
हिंदीचा शब्दांचा वापर
नमस्ते, नमस्कार, भारतवासीयों को मेरा प्यार भरा नमस्कार.. असे सांगत ओबामा यांनी भाषणाची सुरुवात केली. ‘चाय पे चर्चा’ या हिंदी शब्दाचा वापर करुन त्यांनी भारतीयांवर स्वतःची छाप पाडण्याचा प्रयत्न केला.









