
ठाणे – भिवंडीतील माणकोली गावातील मढवी कंपाऊंड परिसरातील लाकूड भंगाराच्या गोदामाला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती.
या आगीत होरपळून आठ कामागारांचा मृत्यू झाला आहे. तीन कामगार गंभीररीत्या भाजले असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
मध्यरात्री तीनच्या सुमारास अचानक एका गोदामामध्ये आग भडकली ही आग वेगाने बाजूला लागून असलेल्या तीन गोदामांमध्ये पसरली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या बारा गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळवल आहे.
या आगीत आणखी किती जिवीतहानी झाली याची खातरजमा करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून गोदामामध्ये शोधकार्य सुरु आहे. रात्रीच्यावेळी या गोदामामध्ये नेमके किती कामगार झोपले होते ते स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या आगीत होरपळून मरण पावलेल्या सात मृतांची ओळख पटली असून, कालिया गोमती रायदात (२०), राजू पतेत्री चव्हाण (३५), मुन्नीबाई यादव (२६), मराई (३०), अजय (३८), गौरी चव्हाण (२८) निरज (२१) अशी या मृतांची नावे आहेत. एका मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.
ही आग नेमकी कशामुळे लागली ते स्पष्ट झालेल नाही. अग्निशमन दलाच्या जवनांनी सुरुवातीला पाच मृतदेह बाहेर काढले. मात्र आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आणखी तीन मृतदेह सापडले. त्यामुळे या आगीमध्ये नेमका किती जणांचा मृत्यू झाला ते अजून स्पष्ट झालेले नाही.









