भीमशक्तीच्या जिल्हा संघटकाचा खून

images

औरंगाबाद – भीमशक्तीचे जिल्हा संघटक राजू जाधव यांचा चाणक्यपुरी भागात चाकूने वार करुन निर्घृण खून करण्यात झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडली. जाधव यांनी भाचीला छेडणाऱ्या एकाला मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपीने दोन साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याचा संशय आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून जवाहरनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिल‌िंदनगर भागातील रहिवासी राजू यादवराव जाधव (वय ४४) हे सोमवारी रात्री दुचाकीवर विभागीय क्रीडा संकुलाकडून उस्मानपुरा भागाकडे जात होते. यावेळी त्यांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या सचिन सुरेश पगारे (वय २८), अनिल प्रल्हाद बदाडे (वय २० सर्व रा. मिल‌िंदनगर) व एका १७ वर्षाच्या तरुणाने अडवले. या तरुणांनी चाकूने राजू जाधव यांच्यावर सपासप वार करणे सुरु केले. गंभीर जखमी अवस्थेत राजू जाधव याना सोडून आरोपीनी पलायन केले. दरम्यान नागरिकांनी हा प्रकार जवाहरनगर पोलिसांना कळवला. पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी सहकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत राजू जाधव यांना घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. या दरम्यान जाधव यांनी हल्ला करणाऱ्यांची नावे पोलिसांना सांगितली. उपचार सुरू असताना मध्यरात्री दीड वाजता राजू जाधव यांचा मृत्यू झाला. जवाहरनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी पोलिस निरीक्षक कदम यांच्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रात्रीतून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. सचिन पगारे याने काही दिवसापुर्वी राजू जाधव यांच्या भाचीची छेड काढली होती. त्यावरून जाधव यांनी त्याला मारहाण केली होती व पुन्हा छेड काढल्यास ‘गेम’ करतो अशी धमकी दिली होती. या घटनेचा राग तसेच ठार मारल्याची धमकी दिल्याने ‌भिती सचिनच्या मनात निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरुन जाधव यांची दुचाकी, चाकूची मुठ तसेच दुचाकीची लोखंडी चैन जप्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 × = twenty eight