
यवतमाळ : डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे अंधत्व आलेल्या भूमिका राय या प्रकरणाचा सखोल तपास करावा, असा आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम.एस. तिवारी यांनी वडगाव रोड पोलिसांना दिला आहे.
येथील डॉ. संजीव जोशी यांनी केलेला चुकीचा औषधोपचार आणि हलगर्जीपणा यामुळे भूमिकाला कायमचे अंधत्व आल्याची तक्रार तिचे वडील सुजीत राय यांनी मार्च २0१२ मध्ये नोंदविली होती. याप्रकरणात वडगाव रोड पोलिसांनी फिर्यादीनुसार तपास न करता आरोपीचा बचाव व्हावा, अशा पद्धतीने आरोपपत्र दाखल केले, असा आरोप राय यांनी केला आहे. दरम्यान त्यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोडचे कलम १७३(८) नुसार फर्दर इन्व्हेस्टिगेशन करण्याचे दिशानिर्देश करण्यात यावे, असा विनंती करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. शिवाय या डॉक्टरसंदर्भात इतर बाबींचीही चौकशी करावी, अशी मागणी केली होती. यानुसार न्यायालयाने फेरचौकशीचे आदेश दिले आहे. पुरवणी अहवाल दोन महिन्याच्या आत सादर करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. डॉ. संजीव जोशी यांनी वैद्यकीय कागदपत्रांमध्ये खोडतोड करून पोलिसांनी तपास यंत्रणेची दिशाभूल केली. याविषयी अक्षर तज्ज्ञांचे मत या मुद्यावर दिशानिर्देश देण्याची विनंती केली होती. राय यांची बाजू अँड. वीरेंद्र दरणे यांनी मांडली.









