
नवी दिल्ली – भूसंपादन कायद्यात करण्यात आलेल्या बदलांविरोधात ज्येष्ठ सामाजसेवक अण्णा हजार सोमवारपासून दिल्लीत आंदोलन करणार आहेत. त्याआधी ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या या आंदोलनात माओवाद्यांशी संपर्क केला जाईल असे म्हटले आहे. माओवाद्यांच्या सहकार्याबाबत आंदोलनातील सहकारी मेधा पाटकर आणि अरुणा राय यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही अण्णा म्हणाले. जर सर्वांनी सहमती दर्शवली तर चर्चा होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीवेळी अण्णांना विचारण्यात आले, की माओवाद्यांचा दावा आहे की ते आदिवासींच्या जमीनींसाठी संघर्ष करत आहेत. तर, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करु शकता का? यावर अण्णा हजारे म्हणाले, ‘अद्याप केलेला नाही. मात्र पुढे करु.’ अण्णा म्हणाले,की आतापर्यंत हा प्रश्न फक्त आदिवासींपूरता मर्यादित होता. आता सगळ्या देशातील शेतकर्यांचा झाला आहे. त्यांच्या भविष्याशी निगडीत हा प्रश्न आहे. जेव्हा अण्णांना विचारण्यात आले, की माओवादी, समाजवादी आणि इतरही अनेक छोट्या मोठ्या संघटना शेतकर्यांच्या हितासाठी लढा उभारत असल्याचा दावा करत आहेत, तर ते म्हणाले, की आंदोलन सुरु होईन काही दिवसच झाले आहेत. सर्वांशी संपर्क करायला जरा वेळ लागेल. सर्वांनी एका मंचावर आले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन शेतकर्यांसाठी लढा दिला पाहिजे. शेतकर्यांची जमीन ज्या पद्धतीने हडपली जात आहे त्याविरोधात देशव्यापी आंदोलनाची गरज आहे.









