
नवी दिल्ली- भूसंपादन विधेयकाला विरोध करणा-या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सोमवारी दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला. तसेच जमावाला पांगविण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात आले.
केंद्र सरकारने लोकसभेत मंजूर केलेल्या भूसंपादन विधेयकाला काँग्रेससह अन्य सर्व विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. काँग्रेसने या विधेयकाविरोधात सोमवारी दिल्लीत निदर्शने केली. जयराम रमेश, राज बब्बर, रणदीप सुरजेवाला आणि युवक काँग्रेसचे अमरिंदरसिंह ब्रार यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसद मार्ग दरम्यान रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी किसान विरोधी नरेंद्र मोदी, अशा सरकार विरोधात घोषणा दिल्या.
या रॅलीला दिल्ली पोलिसांनी पुढे जाण्यासाठी रोखून धरले. यामुळे कार्यकर्त्यांनी सुरक्षाकडे भेदण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सुरुवातीला लाठीमार आणि नंतर पाण्याचे फवारे मारुन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. यात अमरिंदरसिंह ब्रार यांच्यासह काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाब नबी आजाद, आनंद शर्मा, जयराम रमेश, अंबिका सोनी, अहमद पटेल यांनी जंतर मंतर येथे उपस्थितांना मार्गदर्शन केले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या घटनास्थळी पोहचल्या नाहीत, मात्र त्यांनी अहमद पटेल यांच्यामार्फत कार्यकर्त्यांना एकजूट राखण्यासाठी संदश पाठवला. यात त्यांनी भूसंपादन विधेयकाला काँग्रेसचा कायम विरोध राहिल आणि शेतक-यांसाठी आम्ही कायम साथ देण्याची हमी दिली. तसेच हे विधेयक मागे घेण्यासाठी आंदोलन सुरुच ठेवण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले.
तर याविरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नोयडातील भट्टा- परसौल गावापासून शुक्रवारी पायी निषेध मोर्चा काढला. हा मोर्चा रविवारी रात्री राजघाट येथे पोहचला. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले असून, राज्यसभेत ते मंगळवारी सादर करण्यात येण्याची शक्यता आहे.
तर जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदी यांच्या १० लाखाच्या सुटावर सडकून टिका केली. एका साबरमतीच्या संताने आयुष्यभर साधे जीवन जगले आणि आजचे साबरमतीचे महंत १० लाखाचे सूट घालून फिरताहेत, अशी टिका त्यांनी केली. शेतक-यांसाठी जमीन म्हणजे त्यांची आई आहे. मातेसमान ही जमीन कोणीही त्याच्यापासून बळकावून घेऊ शकत नाही, केंद्र सरकारचे हे मनसुबे आम्ही उधळून लावू, असेही ते म्हणाले.









