
नवी दिल्ली- भूसंपादन विधेयकाला झालेल्या तीव्र विरोधामुळे आता भू-संपादन विधेयकात शेतक-यांच्या हितासाठी काही बदल करणे आवश्यक असल्यास ते करण्यास आम्ही तयार आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानंतर लोकसभेत उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी नरमाईची भूमिका घेतली. मात्र भूसंपादन विधेयक, मनरेगा, काळा पैसा, जनधन योजना अशा अनेक मुद्यांवर मोदींनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
सुरुवातीला काही बदल करणे आवश्यक असल्यास ते बदल करु, असे म्हणणा-या मोदींनी काही क्षणातच सरकारने प्रस्तावित केलेले भूसंपादन विधेयक देशातील शेतक-यांच्या हिताचेच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र त्यात काही बदल करायचे असल्यास विरोधी पक्षांनी चर्चा करावी. आम्ही खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत चालायला तयार आहोत. मात्र कारणाशिवाय आणि राजकीय स्वार्थासाठी भूसंपादन विधेयकाला विरोध करु नका, असे मोदी म्हणाले.
त्याचबरोबर काँग्रेसचे भू-संपादन विधेयक शेतक-यांच्या फायद्याचे असते तर लोकांनी त्यांना निवडून दिले असते, अशी मुक्ताफळेही मोदींनी उधळली. तसेच हे सरकार गरिबांसाठी काम करणार असल्याचे आश्वासन दिले. मनरेगा हा काँग्रेसचा ६० वर्षांतला जिवंत पुरावा आहे. हा पुरावा मी मिटवणार नाही. मनरेगा हे काँग्रेसच्या अपयशाचे स्मारक आहे. त्यामुळे आम्ही ती योजना बंद करणार नाही. काळ्या पैशाच्या बाबतीत जी-२० च्या व्यासपीठावर हा विषय घेण्यात आला आहे. तीन वर्ष सरकारने काळ्या पैशासाठी एसआयटी स्थापन केली नव्हती, आम्ही ते काम पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत केले. योजना कुणी आणली, तिचे नाव काय आहे, हा मुद्दा नाही, तर समस्या आहे हे सगळ्यांना मान्य आहे ना, मग समस्या कशी सोडवायची हा मुद्दा आहे. देश स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊ. जनतेच्या समस्या, शेतक-यांचे प्रश्न सर्वजण मिळून सोडवू. काळा पैसा परत आणण्यासाठी ज्यांच्यावर दबाव टाकायचा आहे, त्यांच्यावर सर्वांनी मिळून दबाव टाकू, असे आवाहन मोदी यांनी केले.









