
नवी दिल्ली – नेपाळसह उत्तर भारतात आलेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोधमोहीम आणि मदतकार्य वाढवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. मदतकार्यात लागलेल्या विविध विभागांनी या बैठकीत त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या कामाची माहिती दिली. भारत आणि नेपाळमध्ये झालेले नुकसान तसेच या ठिकाणी सुरु असलेल्या मदतकार्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच रविवारी आलेल्या भूकंपासंदर्भातील माहितीही यावेळी देण्यात आली आहे.
हवाई मार्ग तसेच रस्तामार्गाने मदतकार्याचा वेग वाढवावा, असे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले. भूकंपामुळे अडकलेल्यांना तातडीने बाहेर काढा, असे पंतप्रधानांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. मदतकार्यात लागलेल्या विविध विभागांमध्ये समन्वय राखला जावा, यावरही मोदी यांनी जोर दिला. भूकंपाचा फटका बसलेल्या ठिकाणी अन्न, पाणी, दूध आणि दूध पावडर तात्काळ पोहोचवावे, असे मोदी यांनी सांगितले.या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीयमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणंत्री मनोहर पर्रिकर तसेच विविध विभागाचे उच्चाधिकारी उपस्थित होते









