
यवतमाळ – महसूल विभागाच्यावतीने दरवर्षी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षीसुध्दा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार होते. परंतु जिल्ह्यात दुष्काळीस्थिती असल्याने सदर स्पर्धांचे आयोजन न करता या स्पर्धांवर होणारा खर्च दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सांगितले. यावर्षी फेब्रुवारी व मार्च महिण्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे व फळ पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मान्सून शेतकऱ्यांच्या आशा पुर्ण करतील असे वाटत असतांना अपुऱ्या मान्सूनने सुध्दा शेतकऱ्यांना दगा दिला. गारपीट, अपुरा पाऊस आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मानसिकदृष्ट्या निराश झाले आहे. यावर्षी 250 शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आत्महत्या झाल्या आहे. अशा परिस्थितीत क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेणे उचीत ठरणार नाही शिवाय शेतकऱ्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने सदर स्पर्धा घेण्यात येणार नाही. या स्पर्धासाठी जमा होणारा निधी जिल्ह्यात उद्भवलेल्या टंचाई व दुष्काळीस्थितीसाठी देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून जमा होणारा निधी दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात येणार आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे. अंदाजे पाच लाख रूपये निधी होण्याची शक्यता आहे. इतर नागरी, व्यावसाईकांनी सुध्दा मुख्यमंत्री सहायत निधीसाठी आपले योगदान द्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.









