
मुंबई- महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर मुंबई शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी उत्तर भारतीय नेते व माजी खासदार संजय निरूपम यांच्या नावाची घोषणा झाली. 2008 पासून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे भूषवत होते. तर, मुंबई शहर काँग्रेस अध्यक्षपदावरून अॅड. जनार्दन चांदूरकर यांची दोन वर्षातच तेथून हकालपट्टी केली आहे.
प्रमुख राज्यांत काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. पक्षाच्या कार्यकारिणीतही मोठे बदल होणार असून तरुण नेत्यांना सरचिटणीसपदी नियुक्ती केले जाण्याचे संकेत मिळत आहेत. या बदलात उपाध्यक्ष राहुल गांधी यांची महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे संकेत आहेत. काही राज्यांतील राहुल गांधी समर्थक नेत्यांची कार्यकारिणीवर वर्णी लागू शकते.काँग्रेस संघटनेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल होणार असल्याचे संकेत गेल्या काही दिवसातून मिळत होते. त्याचीच ही झलक असल्याचे मानले जात आहे. दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती झाली आहे. राहुल गांधींकडे पक्षाध्यक्ष जाण्याची ही चाहूल मानली जात आहे.
गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी रविवारी भरतसिंह सोलंकी यांची निवड जाहीर झाली आहे. सोलंकी यांनी केंद्रात मंत्रिपद भूषवले आहे तर 2006 ते 2008 या काळात प्रदेशाध्यक्षपदही भूषविले आहे. गेल्या वर्षी गुजरातमध्ये लोकसभेला एकही जागा मिळाली नसल्याने अर्जून मोढवाडिया यांच्यावर पक्षनेतृत्त्व नाराज होते. भरतसिंह सोलंकी यांचे वडील गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या कार्यकाळात गुजरातमधील सर्व समाजाला काँग्रेससोबत जोडण्याचे काम सोलंकी यांनी केले होते. आता राहुल यांनी त्यांच्या मुलाला संधी दिली आहे.









