महिलांचा जिल्हाकचेरीवर घागर मोर्चा

यवतमाळ,दि. १९ – कळंब तालुक्यातील नांझा ग्राम पंचायतीने ६० लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला सुरूंग लावल्याने गावावर जलसंकट आले आहे. गेल्या महिन्याभरापासून ग्रामस्थांना दोन किमीवरून पाणी आणावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांनी आज गुरुवारी जिल्हा कचेरीवर घागर मोर्चा काढून प्रशासनाविरुद्घ संताप व्यक्त केला.
नांझा ग्राम पंचायतला गेल्या आठ वर्षपूर्वी भारत निर्माण योजनेतून पाणी पुरवठ्यासाठी ६० लक्ष रुपये मंजूर झाले होते. त्यामुळे पंधरादिवसाऐवजी आता दररोज पाणी मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. गावात जलकुं भाचे काम सुरू झाले. पाईपलाईन टाकण्यात आली. त्यानंतर मात्र पंधरादिवसाला येणारे नळ महिना -महिना बेपत्ता झाले. त्यामुळे गावाला बारोमास पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. गेल्या एक महिन्यापासून तर नळाला थेंबरही पाणी आले नसून, महिलांना पाण्यासाठी गावाबाहेर असलेल्या दोन विहिरीवर जावे लागत आहे. त्यासाठी दोन किमीचा प्रवास महिलांना करावा लागत असून, पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्राम पंचायतीकडे अनेकदा केली. मात्र ग्राम पंचायत पाणी पुरवठा योजनाच हस्तांतरीत झाली नसल्याचे सांगून ग्रामस्थांची दिशाभूल करीत आहे. काम करतेवेळी जूनीच पाईप वापरण्यात आल्याने नळ योजना फसल्या गेली आहे. ६० लाख रुपयांच्या निधीत गैरप्रकार केल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पाण्यासाठी त्रासलेल्या महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढून मागणीचे निवेदन दिले. पाण्यासाठी दोन किमीचा प्रवास करावा लागत असून, तात्काळ उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी जयश्री बोदंरे, दुर्गा लेडें, मंदा पुरके, उशा बुरबूरे, रेखा हसतबांधे, रत्नमाला काबंळे, दुर्गा मलकापुरे, बेबी मुके, शालू मुके, बेबी वाघाडे आदी महिला उपस्थित होत्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− five = 2